शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यामध्ये २०२० मध्ये झालेला शाब्दिक वाद चर्चेचा विषय होता. आता २०२१ या वर्षाच्या सुरुवातीलाच या दोघींमध्ये पन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. मात्र आता या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही उडी घेतली आहे. कंगनाने भाजपला खूश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली दिल्याचं तिच्या ट्विटवरुन सिद्ध होत असल्याचं सांगत रोहीत पवार यांनी महाराष्ट्रद्रोही भाजपाचा खरा चेहरा कंगनाने समोर आणल्याबद्दल तिचं अभिनंदन करायला हवं, असा टोला ट्विटरवरुन लगावला आहे.

कंगनाने उर्मिला यांना दिलेल्या रिप्लायचा स्क्रीनशॉर्ट शेअर कर रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “भाजपाला खूश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली देऊन महाराष्ट्रद्रोही असणाऱ्या महाराष्ट्रातील भाजपाचा मुखवटा टरकावत खरा चेहरा पुढं आणल्याबद्दल कंगना रणौतचं अभिनंदनच करायला पाहिजे. या द्रोहाबद्दल भाजपाला काय शिक्षा घ्यायची ते आता राज्याची स्वाभिमानी जनताच ठरवेल,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

आणखी वाचा- “जागा आणि वेळ तुम्ही सांगा मी तिथे येते”; उर्मिला यांचं कंगनाला खुलं आव्हान

काय आहे या ट्विटमध्ये?

कंगनानं उर्मिला यांच्यावर टीका करताना “भाजपाला पाठिंबा देऊन मला काहीच मिळालं नाही. पण उर्मिलाला काँग्रेसमुळे खूप फायदा झाला आहे. उर्मिलाजी मी स्वत:च्या मेहनतीनं घर विकत घेतलं होतं. पण काँग्रेस ते तोडत आहे. भाजपाला खूश करुन माझ्या हातात फक्त २५-३० कोर्ट केस आल्या आहेत. मी ही तुमच्यासारखी समजूतदार असते तर काँग्रसला खूश केलं असतं,” असं म्हटलं आहे. यावरुनच रोहित पवार यांनी कंगनाने भाजपाला खुश करण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली दिली आहे असं म्हटलं आहे.

दरम्यान, कंगनाच्या या ट्विटनंतर उर्मिलानेही आपल्या खास आपल्या शैलीत उत्तर दिलं होतं. प्रिय कंगनाजी, माझ्याबद्दलचे तुमचे सर्व विचार मी ऐकले, मीच काय संपूर्ण देशानं ऐकले आहेत. संपूर्ण देशासमोर सांगतेय की, जागा आणि वेळ तुम्ही ठरवा. सर्व कागदपत्रं घेऊन मी येते. या कागदपत्रामध्ये २०११ मध्ये स्वत:च्या मेहनतीवर अंधेरीत फ्लॅट विकत घेतल्याचा पुरवा मिळेल. २५-३० वर्षाच्या कारकिर्दीनंतर ही संपत्ती विकत घेतली होती, त्याचे पुरावं आहेत. तसेच मार्च २०२० मध्ये तोच फ्लॅट विकल्याची कागदपत्रं आणि पुरावे असतील. त्याच पैशातून विकत घेतलेल्या ऑफिसची कागदपत्रं असतील. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी झालेल्या व्यवहारातून ऑफिस विकत घेतले आहे, हेही दाखवेन, असं उर्मिला यांनी कंगनाला सांगिलं आहे.