शेतकऱ्यांवर जे संकट आलंय त्याची माहिती घेतल्यानंतर तातडीनं येण्याची इच्छा होती. परंतु राज्यात जे काही घडत होतं त्यामुळे येणं जमलं नाही. परंतु राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर आम्ही काही ठिकाणची पिकांची स्थिती पाहिली. अनेक महत्त्वाच्या पिकांवर परिणाम झाल्याचं यामध्ये आमच्या निदर्शनास आलं आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतलेल्या माहितीनुसार सरकारने ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु आम्ही सरसकट पंचनामे करण्याची मागणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली.

ज्यावेळी बांधावर जाऊन पाहिलं त्यावेळी त्या ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं. हरभरा,धान, कापूस, ज्वारी, सोयाबीनचं, तूर, मोसंबी, संत्री या सर्व पिकांचं नुकसान झाल्याचं दिसलं. जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला काही आकडेवारी मिळाली. ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्यांचाच सर्व्हे करण्यात आल्याचं यावेळी निदर्शनास आलं. ४४ हजार २१३ हेक्टर क्षेत्र बाधीत झालं असून ८८ हजार २४३ शेतकरी असल्याचं निदर्शनास आल्याची माहिती पवार यांनी दिली. हेक्टरी ६ हजार ८०० रूपयांप्रमाणे नुकसानग्रस्तांना मदत देण्यात येणार आहे. सरकारी आकडेवारीपेक्षा वास्तविक आकडेवारी अधिक असल्याचं आम्हाला दिसलं, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करण्यावरुन शरद पवारांचं मोठं वक्तव्य

सध्या कापूस कोणी खरेदी करणार नाही, अशा स्थितीत आहे. काही ठिकाणी या ठिकाणापेक्षाही परिस्थिती अधिक गंभीर आहे. सध्याची स्थिती पाहता शेतकरी उठणारच नाही असं दिसून येतंय. लवकरच सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनातही याबाबत चर्चा करण्यात येईल. तसंच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का किंवा पुढील पिकांसाठी भांडवली गुंतवणुकीसाठी शून्य टक्के व्याज दरानं अथवा कमी व्याज दरानं मदत मिळेल का याचा प्रयत्न केला जाईल, असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अर्थमंत्रालय आणि कृषी मंत्रालयात एक बैठक घेण्यावर विचार सुरू आहे. सरकारनं ३३ टक्क्यांची अट न ठेवता सरसकट पंचनामे करावे, त्यावरून नुकसानीचा अंदाज येईल. त्या आकडेवारीनंतरच मदत किती करता येईल, याचा निर्णय घेता येईल, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.