काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे शुक्रवारी रात्री मुंबईतील लीलावती रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पतंगराव कदम यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची हानी झाली आहे. ही हानी कधीही भरून निघणारी नाही. पन्नास वर्षे सार्वजनिक जीवनात पतंगराव कदम कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या आयुष्याची सुरुवात हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेत एक शिक्षक या नात्याने केली अशी आठवणही शरद पवार यांनी ट्विटरवर सांगितली आहे. एक प्रभावशाली मंत्री म्हणून पतंगराव कदम यांनी आपला वेगळा ठसा निर्माण केला असेही त्यांनी म्हटले आहे.

पतंगराव कदम यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द एखाद्या झंझावातासारखी राहिली आहे. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ्यामुळे पतंगराव कदम यांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपासून पोटाच्या आजाराने ते त्रस्त होते. लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आल्यापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तसेच भाजपातील नेत्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.

पतंगराव कदम यांचे पार्थिव आज सकाळी पुण्यातील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंत ते भारती विद्यापीठ धनकवडी येथील शिक्षण संकुलात ठेवण्यात येईल. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील वांगी या ठिकाणी असलेल्या सोनहिरा साखर कारखाना येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.