03 December 2020

News Flash

शरद पवारांनी सांगितल्या तीन गोष्टी अन् काँग्रेस सेनेसोबत येण्यास तयार झाली

महाविकास आघाडीच्या जन्माची गोष्ट

राज्यातील सत्तास्थापनेचा धुरळा आता बसला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कामालाही लागले आहे. पण, त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातील सत्तानाट्यामागील अनेक घटनांवरचे पडदे दूर केले आहेत. त्यात शिवसेना आणि काँग्रेसला सोबत एकत्र कसं आणले याचं उत्तरही पवारांनी दिलं आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत पवार यांनी राज्यात उदयास आलेल्या महाविकास आघाडीच्या जन्माचं कारणं सांगितलं.

आणखी वाचा – सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको : रोहित पवार

शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही वेगळ्या विचारांचे आणि विरोधी पक्ष होते. मग, काँग्रेस शिवसेनेसोबत कशी आली, या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “राज्यात सत्तास्थापन करण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. ज्यावेळी पहिल्यांदा शिवसेनेकडून सांगण्यात आलं की, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत येण्यास तयार आहे. त्यानंतर आम्ही एकत्र येण्याची चर्चा सुरू केली. यात काँग्रेसला सोबत घेण्याविषयी तयार करणे गरजे होते. पण, आतापर्यंत कायम विरोधी भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेनेसोबत कसं जायचं, असं काँग्रेसचं म्हणणं होतं,” असं पवार म्हणाले.

आणखी वाचा – “महाराष्ट्र सरकार आता दाऊदवरीलही सर्व गुन्हे मागे घेईल आणि क्लीन चीट देईल”

“त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत मी बोललो. त्या बैठकीत काँग्रेसनं शिवसेनेसोबत यायला हवं. महाराष्ट्रात परिवर्तन होऊ पाहत आहे. त्यामुळे हे समजून घेतलं पाहिजे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी त्यांना तीन गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट म्हणजे आणीबाणीची. मी सोनिया गांधींना म्हणालो, ज्यावेळी सत्ता हातात असताना इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. त्यावेळी त्यांना सर्वांनीच विरोध केला. अशा काळात फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. तो पहिला पाठिंबा होता. त्यांना दुसरी गोष्ट सांगितली की, आणीबाणीनंतर ज्या निवडणुका झाल्या त्यात एकही उमेदवार देणार नाही, अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतली. ज्या निर्णयानं पक्षाचं अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता होती. तरीही बाळासाहेबांनी टोकाचा निर्णय घेतला. त्याचबरोबर प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपती निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळी काँग्रेसनं शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी माझ्यावर जबाबदारी सोपवली होती. मी बाळासाहेबांना भेटलो. प्रतिभाताई आणि प्रणव मुखर्जी यांना बाळासाहेबांच्या भेटीसाठी घेऊन गेलो. त्यावेळी ‘एनडीए’त असताना सुद्धा शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिला. हे मी सोनिया गांधींना सांगितलं. त्यानंतर काँग्रेस शिवसेनेसोबत येण्यास तयार झाली,” असं शरद पवार यांनी मुलाखतीत सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 11:12 am

Web Title: ncp leader sharad pawar told three reason bmh 90
Next Stories
1 “पक्षातील लोकांमुळेच पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव”
2 सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको – रोहित पवार
3 “महाराष्ट्र सरकार आता दाऊदवरीलही सर्व गुन्हे मागे घेईल आणि क्लीन चीट देईल”
Just Now!
X