“भाजपाचे काही ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यावेळी आमच्यासोबत सरकार बनवा असं सांगितलं होतं. परंतु शरद पवार यांनी आणि पक्षानं त्याला नकार दिला ही सत्य परिस्थिती आहे. त्यानंतर त्यांनी फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं. त्यावेळी अजित पवारांनी काही चुका केल्या. त्यानंतर त्यांनी ती चुका दुरूस्तही केल्या,” असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी व्यक्त केलं. त्यावेळी भाजपानं सत्तेसाठी जे काही केलं होतं त्यावर पडदा टाकण्यासाठी ट्रेडिंग पॉवर या पुस्तकाची मदत घेतली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.

“महाराष्ट्रात जेव्हा त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली, तसंच ज्यावेळी शिवसेना आणि भाजपा हे एकत्र येण्यास तयार नव्हते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही महत्त्वाची होती. कोणाच्याही सोबत गेलं तरी आम्ही सत्तेत जाऊ शकत होतो. परंतु त्यावेळी भाजपासोबत जायचं नाही हा निर्णय झाला होता. भाजपाचे ज्येष्ठ नेते आमच्यासोबत सरकार बनवा असं म्हटलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी त्याला नकार दिला ही सत्य परिस्थिती आहे,” असंही मलिक यावेळी म्हणाले. प्रियम गांधी-मोदी यांचं ‘ट्रेडिंग पॉवर’ हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेलं नाही. परंतु त्यापूर्वी या पुस्तकात केलेल्या दाव्यांवरून हे पुस्तक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

काय म्हटलंय पुस्तकात ?

“त्या बैठकीत शरद पवार यांनी भाजपाला समर्थन देण्याची इच्छा असल्याचं अमित शाह यांना सांगितलं. कोणतं खातं कोणाला देण्यात येईल याबाबतही त्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रपती शासन आणण्यास ते मदत करतील असंही त्या बैठकीत ठरवण्यात आलं. त्यानंतर राज्यातील परिस्थिती सांभाळून घेतली जाईल आणि माध्यमांसमोर येऊन लोकांची स्थिती पाहून महाराष्ट्रात एक स्थिर सरकार स्थापन होण्याची आवश्यकता आहे. तसंच स्थिर सरकार देण्यासाठी मी आणि माझा पक्ष भाजपाला समर्थन देण्यास तयार आहोत हेदेखील ठरलं,” असं त्या म्हणाल्या. त्यावेळी शरद पवार यांनी केवळ अमित शाह यांच्याशी भेट झाली आणि त्यानंतर २० तारखेला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतल्याचं प्रियम गांधी म्हणाल्या.

वाचा – नक्की काय आहे पहाटेच्या शपथविधीची गोष्ट?; पुस्तकातून झाला गौप्यस्फोट

“यावेळी शिवसेना आणि काँग्रेसही राष्ट्रवादीसह सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते. शरद पवार यांना कोणीही समजू शकत नाही. ज्यावेळी सरकार स्थापन करण्याची वेळ आली त्यावेळी काँग्रेस आणि शिवसेना अनेक गोष्टींचा त्याग करण्यास तयार होते. त्यामुळे सत्तेचं केंद्र राष्ट्रवादीकडे आलं असतं म्हणून कदाचित त्यांचं मन बदललं,” असा दावाही त्यांनी केला. “ज्यावेळी शरद पवार यांनी आपलं मन बदललं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्या निर्णयाचं समर्थन केलं नाही. परंतु तोंडी झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी तीन पक्षांचं सरकार चालणार नाही असं वाटत असल्याचं सांगत विरोध केला होता. भाजपालाही आपण समर्थन दिलं पाहिजे असंही ते म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना आपला जुना प्लॅनच पुढे नेण्यासाठी अजित पवार तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं,” असा दावा प्रियम गांधी यांनी केला.