हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेवर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केले. “हिंगणघाटमध्ये या तरुणीला आरोपीनं जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात पीडितेचा मृत्यू झाला. पण हा मृत्यू नाही, तर हत्या आहे. आरोपीला शिक्षा व्हावी. कारण तातडीनं न्याय मिळतो, हा संदेश जायला हवा,” अशी संतप्त प्रतिक्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
हिंगणघाटमधील महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या तरुणीला आरोपी विकेश नगराळे यानं पेट्रोल टाकून पेटवून दिलं. मागील सोमवारी ही घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचं विशेष पथक तरुणीवर उपचार करत होतं. मात्र, सोमवारी अचानक ह्रदयविकाराच्या धक्क्यानं तिचा मृत्यू झाला.
आणखी वाचा – हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा संघर्ष थांबला; उपचारादरम्यान मृत्यू
या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. “अतिशय दुःखद..! हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होतेय. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलावी ही विनंती. या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत,” असं सुळे यांनी म्हटलं आहे.
अतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यु झाला.या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय.पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती.या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली.तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
— Supriya Sule (@supriya_sule) February 10, 2020
आणखी वाचा – “माझ्यासमोर आरोपीला जिवंत जाळा”; पीडितेच्या वडिलांची मागणी
“जलदगतीनं हा खटला चालवण्यात यावा, जेणेकरून तातडीनं न्याय मिळतो हा संदेश जायला हवा. त्याचबरोबर आरोपीलाही जरब बसली पाहिजे. ही घटना अत्यंत दु:खदायक असून, तिच्या कुटंबियांच्या पाठिशी उभं राहणं गरजेचं आहे. अवघ्या २१-२२ वर्षांची ती तरुणी होती. आरोपींनं क्रूर कृत्य केलं आहे,” असंही सुळे म्हणाल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 10, 2020 9:23 am