सत्ता लाल दिवा घेऊन मिरवण्यासाठी नाही तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी हवी, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर निशाणा साधला. तर शिवसेनेची परिस्थिती ‘एक हात मे दो लड्डू’, अशी झाली आहे. ते सरकारवर टीकाही करतात आणि सत्तेत ही राहतात. ते सरकारला फक्त धमकी देतात की सत्ता सोडून जाऊ. आता भाजपलाही सवय झाली आहे. तेही काही प्रतिक्रिया देत नाही. त्यांनाही माहिती आहे शिवसेना कुठे जात नाही, असा चिमटा सुळे यांनी काढला.

सुप्रिया सुळे या शुक्रवारी पैठण दौऱ्यावर होत्या. पैठणमधील महिला, वकील, व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. भाजपावर टीका करताना त्या म्हणाल्या, ग्रामीण भागातील वित्तपुरवठ्याची सोपी व सुरक्षित साधनं मोडीत निघाली आहेत. वेळीच योग्य ती पावलं उचला अन्यथा काट्याचा नायटा होण्यास वेळ लागणार नाही.

चार वर्षांपूर्वी मोठ्या विश्वासाने जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांना सत्ता दिली पण एकही काम झाले नाही. या सरकारचा एकही निर्णय ठोस नाही. कर्जमाफी दिली पण ती अजूनही लोकांपर्यंत पोहोचली नाही. २००९ साली शरद पवार साहेबांनी सर्वात मोठी कर्जमाफी दिली होती. तेव्हा लोकांना घरबसल्या कर्जमाफी मिळाली होती, असेही त्यांनी नमूद केले.

जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत महिलांच्या डोक्यावरचा कळसा घालवायचा आहे. त्यांच्या घरातील नळाला पाणी आणायचे आहे. सत्ता लाल दिवा घेऊन मिरवण्यासाठी नाही तर सर्वसामान्य माणासाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी हवी, असेही सुळे यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने पेट्रोलवरील करात पाच रुपयांनी कपात केली. मात्र पेट्रोल पंपावर फक्त ४ रुपयांनी पेट्रोल कमी झाले. अशी या सरकारची खोटी वागणूक असून सरकारने नोटाबंदी केली पण त्यातून काय साध्य झाले? नव्या नोटांसाठी जेवढा खर्च केला तेवढ्या खर्चात एसटीची सुविधा नीट झाली असती, ग्रामीण भागात पाण्याची व्यवस्था झाली असती, ग्रामीण भागातील रस्ते नीट झाले असते, गरीब जनतेला रेशन मिळाले असते. आम्ही सत्तेत आलो तर विद्यार्थ्यांना सर्वाधिक सुविधा देऊ,सर्वात आधी छेडछाड मुक्त महाराष्ट्र करु,एसटी सेवा सुरळीत करु, असे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले.