राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनेचा छळ केल्याप्रकरणी विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावर विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत आपल्यावरील सर्व आरोपांचं खंडन केलं.
“विद्या चव्हाण यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. सुनेच्या मोबाईलमधील चॅट आणि अन्य काही बाबींवरून तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. माझ्या मुलानं यासंदर्भातील सर्व पुरावे गोळा केले आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकाराची आम्हाला कल्पना दिली. त्यांनी घटस्फोटासाठी वकीलांशी संपर्कदेखील साधला होता,” अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
“नवरा बायकोच्या वादात मला भोवण्यात आलं. दुसरी मुलगी झाली म्हणून करण्यात आलेले आरोप हे चुकीचे आहेत. आम्ही दुसऱ्या मुलीलाही तळाहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. मी कायम महिलांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं आहे. कायदा दुधारी शस्त्र आहे. त्याचा गैरवापरही होऊ शकतो. परंतु कोणी त्याचा चुकीचा वापर करत असेल तर त्याला कदाचित याचे परिणाम भोगावे लागतील याची कल्पना नसावी. कायदेशीर मार्गानं हा लढा सुरूच राहिल,” असंही त्यांनी नमूद केलं.
आणखी वाचा- राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याविरोधात सूनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा
काय आहे प्रकरण ?
सूनेचा छळ केल्याप्रकरणी विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात १६ जानेवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. सूनेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 3, 2020 10:29 am