नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी मुलांच्या विवाहसोहळ्यावर लाखोंची उधळपट्टी केल्याचे पाहून झोप उडालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निद्रानाशाचा अधिकच त्रास होईल अशीच कृत्ये त्यांच्या अनुयायांनी शुक्रवारी केली. दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर विवाह-वाढदिवस अशा खासगी सोहळ्यांवर पैसा खर्च न करण्याचे आवाहन शरदरावांनी केले असतानाही नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडे यांनी मुलीच्या विवाहसोहळ्यावर तर पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाढदिवसावर शुक्रवारी पाण्यासारखा पैसा खर्च केला. राष्ट्रवादी नेत्यांची ही चंगळवादी वृत्ती अधिकच वाढीस लागल्याचे त्यामुळे अधोरेखित झाले. कुल्र्यातील आमदार मिलिंद कांबळे यांनीही काही दिवसांपूर्वी त्यांच्या वाढदिवशी हजारोंच्या पंगती उठवल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पिंपरीचे आमदार जगताप यांची भोजनावळ
 पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप यांनीही साहेबांचा सल्ला धाब्यावर बसवून आपला वाढदिवस ‘लक्षभोजना’ ने साजरा केला. जगताप हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते. मात्र, त्यांचा विधानसभेला मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटल्याने ते अपक्ष उभे राहिले आणि निवडून आले. ते तांत्रिकदृष्टय़ा अपक्ष आमदार असले, तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारे आहेत.राष्ट्रवादीचे मंत्री भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे आपल्या मुला-मुलीच्या लग्नानिमित्त केलेल्या उधळपट्टीवर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. या पाश्र्वभूमीवर साहेबांना मानणाऱ्या आमदार जगताप यांनी दुसऱ्याच दिवशी स्वत:च्या वाढदिवसानिमित्त नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानात लाखभर लोकांसाठी जेवणावळ आयोजित केली. या जेवणावळीत  लाखाच्यांवर लोक लोटले होते.
उपमहापौरांचा शाही थाट
 नवी मुंबई  :  नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडे यांनी शुक्रवारी दिवसभर नेरुळ, सीवूड येथे आपल्या मुलीच्या लग्नाचा शाही थाट मांडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, पवारसाहेबांच्या सल्ल्याची पत्रकारांनी आठवण करून देताच दिवसभर पाहुणे मंडळींच्या स्वागतामध्ये मग्न असलेले उपमहापौर गडबडले आणि त्यांनी लागलीच ‘साहेबां’ची माफी मागितली. माझी मुलगी पायलट आहे, उच्चशिक्षित आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने भावनाविवश होऊन हा थाट मांडला, अशी सारवासारवही गावडे यांनी केली. गावडे सीवूड परिसरातील नगरसेवक आहेत. लग्नासाठी हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी जमले होते. त्यांच्यासाठी पंगतीचा खास बेत आखण्यात आला होता.
मुंबईतही आमदाराचे ‘गावजेवण’
मुंबई : काही दिवसांपूर्वी कुर्ला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार मिलिंद कांबळे यांनी स्वतचा वाढदिवस मोठय़ा धुमधडाक्यात साजरा करून हजारोंच्या पंगती उठविल्याची माहिती आता समोर आली आहे. यावर आपण जनतेवरील प्रेमाखातर ही भोजनावळ उठविल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.