सामाजिक बहिष्कारही; माढय़ातील प्रकार; पाच जणांविरोधात गुन्हा
गावातील दलित वस्तीत दुष्काळात पाण्याच्या तीव्र टंचाईचे संकट उद्भवले असताना त्यासाठी दलित वस्तीत पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून विनवणी करण्यासाठी गावच्या सरपंचाकडे गेलेल्या दलित ग्रामस्थांना सरपंचाशी संबंधित व्यक्तींनी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करायची नाही, केली तर हात पाय तोडून टाकू, असे धमकावत जातीवाचक शिवीगाळ केली. गंभीर बाब म्हणजे गावात दलित समाजावर बहिष्कार घालण्यात आला. ही घटना माढा तालुक्यातील जामगाव येथे घडली. या प्रकरणी पाच जणांविरूध्द माढा पोलिसांनी अ‍ॅट्रासिटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोपट विठ्ठलराव पाटील, मोहनराव विठ्ठलराव पाटील, रवी मोहन पाटील, रमेश विठ्ठलराव पाटील व हेमंत विठ्ठलराव पाटील अशी या गुन्ह्य़ातील आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण राष्ट्रवादी काँंग्रेसशी संबंधित
आहेत.
यासंदर्भात सुंदराबाई संभाजी गायकवाड या मागासवर्गीय महिलेने फिर्याद दिली. माढा तालुक्यात बागायती म्हणून प्रसिध्द असलेल्या जामगावात सध्या दुष्काळामुळे पाण्याची टंचाई सतावत आहे. गावातील दलित वस्तीत पाणीटंचाई प्रकर्षांने भेडसावत असताना त्याठिकाणी पाण्याची व्यवस्था होण्यासाठी सुंदराबाई गायकवाड यांच्यासह दलित ग्रामस्थ गावचे सरपंच सुहासकाका पाटील यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते.
त्या वेळी सरपंच सुहास पाटील यांच्याशी संबंधित असलेले पोपट पाटील व इतरांनी सुंदराबाई यांना जातीवाचक दमदाटी केली. पाण्याची व्यवस्था करणे तर दूरच, परंतु गावात डॉ. आंबेडकर जयंती उत्सव साजरा करायचा नाही म्हणून त्यांना धमकावण्यात आले. सुंदराबाई गायकवाड ह्य़ा गावातून रस्त्यावर पायी चालत जात असताना पोपट पाटील, मोहनराव पाटील व इतरांनी मोटार आडवी घालून पुन्हा दमदाटी केली.
एवढेच नव्हे, तर गेल्या एप्रिल महिन्यात गावातील आंबेडकरी समाजाने डॉ. आंबेडकर जयंती उत्सव साजरा केला असता या समाजावर जाणीवपूर्वक सामाजिक बहिष्कार घालण्यात आला होता. दलित वस्तीवर हेतूत: पाणीपुरवठय़ाची व्यवस्था केली जात नाही, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.