सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर टीका

सांगली : पक्ष अडचणीतून जात असताना सचिन अहिर यांच्यासारखा एक सहकारी पक्ष सोडून गेल्याचे दु:ख आहे. मात्र जो लढाईच्या वेळी बरोबर राहतो, तोच खरा कार्यकर्ता असतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी लगावला.

पाटील म्हणाले, की अहिर यांनी आमच्याबरोबर गेली कित्येक वर्षे काम केले आहे. शरद पवार आणि पक्षाने त्यांना अनेक जबाबदाऱ्या दिल्या. आमदार, मंत्रिपदाची संधी दिली. असे असूनही त्यांनी पक्ष का सोडला हे समजत नाही. आज पक्षाची स्थिती वाईट असताना त्यांनी पक्ष सोडल्याचे दु:ख आहे. मात्र जो लढाईच्या वेळी बरोबर राहतो, तोच खरा कार्यकर्ता असतो, असा टोलाही पाटील यांनी या वेळी लगावला. अहिर यांनी नेमक्या कोणत्या कारणाने पक्ष सोडला याची माहिती मिळाली नाही, मात्र मुंबई शहरातील सर्व जिल्हाध्यक्ष एकत्र असून त्यांनी आम्ही पक्षाबरोबरच राहणार असल्याची ग्वाही दिली आहे. अहिर यांनी पक्ष सोडल्याने पक्षावर फारसा परिणाम होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुश्रीफ यांच्यावरील प्राप्तिकर विभागाच्या छाप्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, की मुश्रीफ यांना मी गेल्या कित्येक वर्षांपासून ओळखतो आहे. ते अगदी सरळ, साधे व जनतेतील आहेत. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्य़ासह सांगली जिल्ह्य़ातील कित्येक गोरगरिबांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविले आहेत. असे असताना त्याच्या मागे अशा पद्धतीने शुक्लकाष्ठ लावण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न दिसतो, अशी टीका पाटील यांनी केली.