क्षीरसागर अंतर्गत ‘गट कलहाने’ राजकीय वातावरण तापले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपालिकेचे सर्वेसर्वा गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात मुस्लिम समाजाच्या १० नगरसेवकांनी केलेल्या बंडापाठोपाठ पक्षाच्याच आणखी ५ नगरसेवकांनी थेट प्रसिद्धीपत्रक काढून पालिकेतील सत्ता क्षीरसागर यांच्यामुळे मिळाली आहे, पण गटनेते मात्र सर्व काही आपल्यामुळेच असल्याचे दाखवत पक्षांतर्गत ‘हा आपला हा त्यांचा’ असा भेद करीत कार्यकर्त्यांना वेठीस धरत आहेत, असा आरोप केल्याने पक्षातील क्षीरसागर अंतर्गत ‘गट कलह’ उघडपणे दिसू लागला आहे. निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांच्या बंडातून अंतर्गत वाद वाढला असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

बीड नगरपालिकेत मागील ३० वर्षांपेक्षा अधिक काळ राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे एकतर्फी वर्चस्व आहे. महिला आरक्षण असल्यामुळे या वेळी रत्नमाला धुमाळ यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा असली, तरी गटनेते डॉ. क्षीरसागर यांच्याकडेच कारभार असतो.

दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांचा राजकीय वारसा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, रवींद्र क्षीरसागर यांच्याकडे असून क्षीरसागर बंधुंची दुसरी पिढीही सक्रिय झाली आहे.

गजानन साखर कारखान्याचे अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर यांचा मुलगा संदीप जि.प. बांधकाम सभापती, तर डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा मुलगा डॉ. योगेश पालिकेच्या माध्यमातून सक्रिय आहेत. क्षीरसागर कुटुंबाचा जिल्हाभरात प्रभाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे डॉ. क्षीरसागर यांच्याकडे आहेत. कुटुंबांतर्गत शहर-ग्रामीणच्या सीमा ठरलेल्या असल्यामुळे कारभार आलबेल राहिला. मात्र, मागील काही दिवसांपासून अंतर्गत धुसफूस वाढल्याचे काही घटनांवरुन दिसू लागले आहे.

नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर असताना क्षीरसागर अंतर्गत गट कलह निर्माण झाल्याने नगरसेवकांचे बंड झाले असल्याचे मानले जात आहे. पंधरा दिवसांपूर्वी पालिकेतील राष्ट्रवादीच्या ४५ पकी मुस्लिम समाजाच्या १० नगरसेवकांनी पत्रकार बठक घेऊन डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या एकाधिकारशाहीवर आणि भ्रष्ट कारभारावर तोफ डागत बंडाचे निशाण फडकावले. बंड केलेले बहुतांशी नगरसेवक अंतर्गत दुसऱ्या गटाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात होते. बंडानंतर काही नगरसेवकांनी माध्यमांकडे खुलासे करीत डॉ. क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत घरवापसीही केली.

मंगळवारी सायंकाळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या पक्षाच्या पाच नगरसेवकांनी प्रसिद्धीपत्रक काढून गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप केला, तसेच पालिकेची सत्ता केवळ जयदत्त क्षीरसागर यांच्यामुळे आल्याची आठवण करून देत नाराजीचा सूर आळवला.

नगरसेवक विनोद धांडे, अशोक शिराळे, अमर नाईकवाडे, बाळासाहेब गुंजाळ, सुनील महाकुंडे यांनी दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांच्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने पालिकेची सत्ता क्षीरसागर कुटुंबाच्या ताब्यात दिली. मात्र, मागील काही दिवसात गटनेते सर्व काही आपल्यामुळेच झाले आहे, असा दावा करीत हा त्यांचा हा आपला, अशी कार्यकर्त्यांची विभागणी करीत वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे. अशा त्यांच्या राजकारणाला कंटाळून १० नगरसेवकांनी बंड केले. मात्र, त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे गटनेत्यांनी सत्ता कोणामुळे आहे, सर्व नगरसेवक पक्षाचे आहेत याचा विचार करावा, असा सल्ला देत डॉ. क्षीरसागर यांच्या कारभारावर खरमरीत टीका केली. क्षीरसागर अंतर्गत कलह नगरसेवकांच्या बंडाच्या माध्यमातून समोर आल्यामुळे राजकीय वातावरण गरम झाले आहे.