पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच असून बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान आज त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सादर केला. उद्या म्हणजेच बुधवारी दिलीप सोपल शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

आमदार सोपल यांच्याबरोबर याच दिवशी सोलापुरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचाही शिवसेना प्रवेश होणार आहे. या दोन्ही नेत्यांच्या पाठोपाठ आता माढय़ाचे राष्ट्रवादीचे पवारनिष्ठ आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्यासह अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे व पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या संभाव्य राजकीय निर्णयाविषयीही उत्सुकता वाढली आहे.

अलीकडे करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाला धक्का दिला होता. त्यानंतर बार्शीचे ज्येष्ठ आमदार दिलीप सोपल यांनीही सेना प्रवेशाचा निर्णय घोषित करून दुसरा धक्का दिला. आमदार सोपल हे २००४ सालचा अपवाद वगळून १९८५ सालापासून विधानसभेवर प्रतिनिधित्व करतात. त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. आगामी बार्शीची विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी आहे. शिवसेनेकडून मिळेल ती जबाबदारी सांभाळण्यासाठी आपण सज्ज आहोत. आपण राष्ट्रवादीवर किंवा नेतृत्त्वावर नाराज नव्हतो. जनभावनेचा आदर करून आपण शिवसेनेत जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.