25 November 2020

News Flash

सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको – रोहित पवार

"राहुल बजाज यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी उद्योगपतींना आपल्या केंद्र सरकारची भीती वाटत असेल तर नक्कीच ही चिंताजनक बाब आहे"

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी देशात सध्या भीतीचे वातावरण तयार झाले असून लोक सरकारवर टीका करण्यास घाबरत आहेत असं परखड मत व्यक्त केलं आहे. यानंतर सगळीकडे राहुल बजाज यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीदेखील आपलं मत मांडलं असून आपल्यावरील टीका देखील न ऐकून घेण्याच्या या सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको अशी भीती व्यक्त केली आहे.

रोहित पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “राहुल बजाज यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी उद्योगपतींना आपल्या केंद्र सरकारची भीती वाटत असेल तर नक्कीच ही चिंताजनक बाब आहे. केंद्र सरकारमधील मंत्री सांगत आहेत, त्याप्रमाणे बहुतेक तुम्ही चांगलं काम करत देखील असाल पण उद्योगधंद्यांची वस्तुस्थिती वेगळी आहे. उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाच उद्योगधंद्यांच्या खऱ्या समस्या माहीत आहेत, आपल्या अनुभवाच्या जोरावर या समस्या सोडवण्यासाठी काही उपाय देखील हे लोक सुचवू शकतात”.

पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “सरकार आणि उद्योगपती यांच्यात जर चांगला संवाद असेल, धंद्यासमोरच्या खऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याची सरकारची तयारी असेल तर देशाच्या आर्थिक विकासाला नक्कीच गती मिळू शकते पण यासाठी गरज आहे ती उद्योगपतींशी संवाद साधण्याची, त्यांची बाजू ऐकून घेण्याची. मला एकच भीती वाटते ती म्हणजे, आपल्यावरील टीका देखील न ऐकून घेण्याच्या या सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको”.

राहुल बजाज यांनी काय टीका केली होती ?
देशात सध्या भीतीचे वातावरण बनले असून लोक सरकारवर टीका करण्यासही घाबरत आहेत. लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा का नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. एका चर्चात्मक कार्यक्रमामध्ये बजाज यांनी आपली भुमिका मांडली. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे उपस्थित होते.

आणखी वाचा – देशात भीतीचे वातावरण; अमित शाहांसमोर राहुल बजाज यांनी सरकारला सुनावले खडे बोल

बजाज म्हणाले, “सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा लोकांना का नाही? लोकांना युपीएच्या सरकारवर टीका करण्याचे स्वातंत्र्य होते. मात्र, सध्याच्या सरकारने भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण केले आहे. युपीए-२च्या कार्यकाळात आम्ही कोणावरही टीका करु शकत होतो”.

आणखी वाचा – आम्ही टीका खुलेपणाने स्वीकारतो : सीतारामन

अमित शाह यांचं उत्तर
बजाज यांच्या या प्रश्नांना उत्तर देताना अमित शाह म्हणाले, “देशात कुठल्याही प्रकारच्या भीतीचे वातावरण नाही. कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. मोदी सरकारवर माध्यमांमधून कायमच टीका होत राहिली आहे. तरीही तुम्ही म्हणत असाल की देशात असे वातावरण आहे तर ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्हाला काम करावे लागेल. सरकार पारदर्शी पद्धतीने काम करीत आहे. कोणती टीका होत असेल तर त्याला गांभीर्याने घेत आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करीत असतो”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 10:03 am

Web Title: ncp mla rohit pawar industrialist rahul bajaj central government narendra modi amit shah sgy 87
Next Stories
1 “महाराष्ट्र सरकार आता दाऊदवरीलही सर्व गुन्हे मागे घेईल आणि क्लीन चीट देईल”
2 राज्य सरकार मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे मत्स्यालय; मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना
3 मोकाट कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार
Just Now!
X