News Flash

सोलापुरातही राष्ट्रवादीच्या आमदारांची मुलाखतीकडे पाठ

बबनराव शिंदे, दिलीप सोपल यांच्याबद्दल ‘संशयकल्लोळ’वाढला

(संग्रहित छायाचित्र)

बबनराव शिंदे, दिलीप सोपल यांच्याबद्दल ‘संशयकल्लोळ’वाढला

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याकरिता पक्षाचे नेते अजित पवार हे शुक्रवारी सोलापुरात आले असता या मुलाखतींना जिल्ह्य़ातील माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे दोघे गैरहजर राहिले. एकीकडे दोन्ही काँग्रेसमधील काही आजी-माजी आमदारांसह साखर कारखानदार भाजप-सेना युतीच्या मार्गावर असल्याच्या हालचाली होत असताना दुसरीकडे पक्षाने घेतलेल्या मुलाखतींकडे दोन वजनदार आमदारांकडून पाठ फिरविण्याचा प्रकार ‘संशयकल्लोळ’ वाढविणारा असल्यामुळे तो चर्चेचा विषय झाला आहे.

दरम्यान, आमदार सोपल व शिंदे हे दोघेही मुलाखतींसाठी गैरहजर राहिल्याबद्दल अजित पवार यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता त्यांना पक्षातील या गोंधळावर सारवासारव करण्याची वेळ आली.

जिल्ह्य़ात सध्या विधानसभेच्या अकरापैकी चार जागा राष्ट्रवादीेच्या ताब्यात आहेत. यात माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे व बार्शीचे आमदार दिलीप सोपल या दोघांनी पक्षाच्या मुलाखतीला हजर राहण्याचे आज टाळले. दुसरीकडे मोहोळचे आमदार रमेश कदम हे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळाप्रकरणी कारागृहात आहेत. तर माळशिरसचे आमदार हणमंत डोळस यांचे निधन झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्य़ात विधानसभेच्या सर्व अकरा जागांसाठी एकूण ६२ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यात मोहोळ राखीवमधून सर्वाधिक २० तर सोलापूर शहर मध्य-९, माळशिरस- ७, सोलापूर शहर उत्तर-५, पंढरपूर-४, सांगोला-२, तर माढा, बार्शी, करमाळा-प्रत्येकी एक याप्रमाणे इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. करमाळ्यातून एकमेव रश्मी बागल-कोलते यांनी मुलाखत दिली. तेथून विधानसभेची तयारी करीत असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिंदे हे राष्ट्रवादी सोडून अन्य कोणत्या पक्षाचा आधार घेतात किंवा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात येतात, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

पवारांची सारवासारव

सोपल, शिंदे यांच्या गैरहजरीबद्दल स्पष्टीकरण देताना अजित पवार यांच्यावर आज सारवासारव करण्याची वेळ आली. सोपल आणि शिंदे यांचे अनुक्रमे बार्शी, माढय़ातून एकटय़ाचेच अर्ज पक्षाकडे आले होते. परंतु प्रत्यक्ष मुलाखत देण्यासाठी आमदार सोपल हे येऊ शकले नाहीत. सोपल हे तीन दिवस देवदर्शनासाठी श्रीशैल येथे गेले आहेत. तर माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांचाही तेथून एकमेव इच्छुक उमेदवारी अर्ज प्राप्त झाला आहे. परंतु मुलाखतीसाठी शिंदे हे का येऊ शकले नाहीत, याची माहिती नाही. त्याबद्दल त्यांना विचारले जाईल, असे सांगत त्यांनी या नाराजी नाटय़ावर बोलण्याचे टाळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 4:28 am

Web Title: ncp mlas remain absent during candidates interviews in solapur zws 70
Next Stories
1 मुलीच्या विनयभंगातील आरोपीला शिक्षेसाठी पोलिस ठाण्यावर मोर्चा
2 राष्ट्रवादीचे वैभव पिचड भाजपच्या वाटेवर
3 चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला रामराम; कमळ हाती घेण्याची शक्यता
Just Now!
X