News Flash

विदर्भातील पदयात्रेचा राष्ट्रवादीला राजकीय लाभ किती?

नेत्यांसमोर पक्ष बांधणीचे कठीण आव्हान

नेत्यांसमोर पक्ष बांधणीचे कठीण आव्हान

हल्लाबोल आंदोलनाचा भाग म्हणून यवतमाळ ते नागपूर अशी पदयात्रा काढून राष्ट्रवादीने विदर्भात राजकीय वातावरण तापविले असले तरी या आंदोलनाचा राष्ट्रवादीला राजकीय लाभ किती होईल, याची चर्चा सुरू झाली आहे. तळागाळात कार्यकर्त्यांची फौज नसणे, संघटना कमकुवत असणे या पाश्र्वभूमीवर पक्ष बांधणीचे मोठे आव्हान पक्षाच्या नेत्यांपुढे असेल.

यवतमाळ ते नागपूर या पदयात्रेत पक्षाच्या खासदार सुळे व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे शेवटपर्यंत सहभागी झाले होते. अजित पवार, जयंत पाटील आणि सुनील तटकरे आदी नेतेही एखाद दिवसाचा अपवाद वगळल्यास सहभागी झाले होते. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीमुळे या नेत्यांना मुंबईला जावे लागले होते. महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह अन्य काही नेत्यांनी १२ दिवस पायपीट केली. पदयात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. कापसावर आलेल्या बोंडआळीच्या पाश्र्वभूमीवर नेत्यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली.

या पदयात्रेचा राष्ट्रवादीला राजकीय लाभ किती होणार हा खरा प्रश्न आहे. विदर्भ आणि मुंबई या दोन विभागांमध्ये राष्ट्रवादी कमकुवत आहे. विधानसभेच्या ६२ जागा असलेल्या विदर्भातून गेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त एक आमदार निवडून आला होता. विदर्भात पक्षाला बाळसे धरता आलेले नाही. प्रफुल्ल पटेल, अनिल देशमुख, मनोहर नाईक, बंग, डॉ. राजेंद्र शिंगणे आदी नेतेमंडळी आहेत.

पक्षाने या साऱ्यांना सरकारमध्ये संधी दिली. पण पक्ष संघटना वाढू शकली नाही. या पदयात्रेच्या आधी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी चार दिवसांचा दौरा केला होता. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा या चार जिल्ह्य़ांचा पवारांनी दौरा केला होता. दुसऱ्या टप्प्यात पवार उर्वरित जिल्ह्य़ांचा दौरा करणार आहेत. पवारांच्या दौऱ्यानंतर अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. विदर्भात राष्ट्रवादीला ताकद मिळावी हा पवारांचा उद्देश आहे.

शरद पवार आणि विदर्भ

शरद पवार यांच्या नेतृत्वाचा देशभर गौरव झाला. त्यांच्या संसदीय कारकिर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच ७५ वाढदिवसानिमित्त देशातील सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. राज्याच्या राजकारणातील  खाचाखोचा माहित असलेल्या नेत्यांमध्ये पवार हे एकमेव नेते मानले जातात. पण विदर्भाने पवारांना कधीच जवळ केले नाही. १९८० आणि ८५ मध्ये पवारांनी समाजवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्वबळावर निवडणुका लढविल्या. तेव्हाही विदर्भात पवारांच्या पक्षाला अल्प यश मिळाले होते. २००४ मध्ये काँग्रेसबरोबर आघाडीत राष्ट्रवादीचे ११ आमदार निवडून आले होते. तर गेल्या वेळी स्वबळावर लढताना पुसदमधून मनोहरराव नाईक हे विजयी झाले. नाईक यांच्या विजयात पक्षापेक्षा त्यांची वैयक्तिक प्रतिमा महत्त्वाची ठरली. विदर्भाने पवारांना तेवढी साथ दिली नाही. राज्यात आघाडीचे सरकार सत्तेत असताना विदर्भात मोठय़ा प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. तेव्हा पवार केंद्रात कृषीमंत्री होते. पण पवारांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही, असा आरोप त्यांच्यावर झाला होता. तसेच विदर्भाच्या वाटय़ाचा निधी पश्चिम महाराष्ट्रात वळविण्यात राष्ट्रवादीच्या तत्कालीन मंत्र्यांची भूमिका महत्त्वाची होती. यामुळेच विदर्भात राष्ट्रवादीबद्दल तेवढे चांगले मत नाही. काँग्रेसचा पाया विदर्भात मजबूत असल्याने राष्ट्रवादीला काँग्रेसची मक्तेदारी मोडून काढणे शक्य झाले नाही. १९७७च्या जनता लाटेतही विदर्भाने काँग्रेसला साथ दिली होती. काँग्रेसला शह देण्यात राष्ट्रवादीला यश आले नाही. राष्ट्रवादीची विदर्भात तेवढी ताकद नाही किंवा कार्यकर्त्यांची फौजही नाही. नेत्यांनी दौरे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याचा दीर्घकाळ राजकीय लाभ मिळावा म्हणून स्थानिकांशी संपर्कात राहणे हे महत्त्वाचे असते. राष्ट्रवादीकडे नेते बरेच असले तरी विदर्भात कार्यकर्त्यांची वानवाच आहे. अशा परिस्थितीत सुप्रिया सुळे यांनी राजकीय वातावरण निर्मिती केली असली तरी त्याचा राजकीय लाभ किती मिळेल याबाबत साशंकता व्यक्त केली जाते.

विदर्भात पक्षाची ताकद नाही ही वस्तुस्थिती आहे. यापुढे आपण मराठवाडय़ाप्रमाणेच विदर्भाचा दर महिन्यात किमान दोन दिवस तरी दौरा करणार आहोत. विदर्भातील बोंडआळीचा प्रश्न शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या लोकसभा अधिवेशनात मांडणार आहे.   – सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी खासदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 1:32 am

Web Title: ncp movement in vidarbha
Next Stories
1 रायगडमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सलोख्यात ‘शेकाप’चा अडसर
2 कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा प्रारंभ २४ डिसेंबरपासून
3 सरकारविरोधात पुन्हा घोषणाबाजी, शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक
Just Now!
X