राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा सध्या सुरु आहे. परभणीमधील जिंतूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मात्र खासदार अमोल कोल्हे यांच्या एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भाषण सुरु असताना अजान सुरु झाल्याने अमोल कोल्हे यांनी आपलं भाषण थांबवलं. अजान संपल्यानंतरच त्यांनी आपलं पुढील भाषण सुरु केलं.

दरम्यान यावेळी अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “गेली चार वर्ष दुष्काळाचा शेष सरकार गोळा करतेय, मग हा गोळा केला जाणारा शेष जातोय कुठे याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे”, असं आव्हान अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना केले. “विमा कंपन्यांचा १६ हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तुमच्या माझ्या शेतकऱ्यांच्या शेतीला नुकसान भरपाई मिळावी म्हणून विमा भरला जातो. परंतु त्यांना हा पीक विमा मिळत नाही आहे”, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना होती, मग पाणी कुठे मुरलंय हेही जनतेला सांगावं असा जाब अमोल कोल्हे यांनी विचारला.

या सभेत अजित पवार यांनीदेखील राज्य सरकारवर सडकून टीका केली. “माहिती अधिकाराचा कायदा कडक करा म्हणून अनेक समाजसेवक ओरडत होते, आंदोलन करत होते. पण आज भाजपाने माहिती अधिकार कायदा संपवला असताना आमच्या वेळी आंदोलन करणारे समाजसेवक आता कुठे गेले? यांची दातखिळी बसलीय का?”, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.

“महादेवासारखा तिसरा डोळा उघडून या सरकारला आपल्याला घालवण्याची गरज आहे. निवडणुका जवळ येत आहेत. ३७० चा मुद्दा इथे काढतील. तो मुद्दा जम्मू आणि काश्मीरचा आहे. त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही भाजप सरकारला पाच वर्षांत काय केले हे विचारा”, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.