राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे सध्या बलात्काराच्या आरोपांमुळे चर्चेत असून विरोधकांकडून वारंवार त्यांच्या राजीनामा मागितला जात आहे. धनंजय मुंडे यांनी गंभीर आरोपांवर आपली बाजू मांडली असून सहमतीनं संबंध असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि धनंजय मुंडे यांचे जीवलग मित्र अमोल कोल्हे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

अमोल कोल्हे सांगलीतील म्हैसाळ येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपा नेत्यांना सुनावलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधक जेवढया नैतिकतेची अपेक्षा करत आहेत तेवढी नैतिकता त्यांनी सत्तेत असताना पाळली होती का?,” अशी विचारणा अमोल कोल्हे यांनी यावेळी केली.

मुंडे प्रकरण: पत्नी-मुलांची माहिती लपवणं आणि निवडणूक आयोग; जाणून घ्या कायदा काय सांगतो

पुढे ते म्हणाले की, “विरोधकांनी आता स्वतःला आरशात पाहिलं पाहिजे. त्यांनी जर आरशात पाहिलं तर त्यांच्या मागण्या रास्त ठरतील असं वाटत नाही”. यावेळी त्यांनी धनंजड मुंडे यांनी आरोपांवर स्पष्टीकरण दिलं असून तेच यावर अधिक बोलतील असं सांगितलं.

शपथ, फेटा आणि अमोल कोल्हे…..धनंजय मुडेंनी सांगितला जिवलग मित्राचा ‘तो’ किस्सा

अमोल कोल्हे यांनी यावेळी औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्याच्या मुद्द्यावरुनही भाजपावर निशाणा साधला. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला ज्यांनी रायगडावर ढोल वाजवले, ज्यांनी महाराजाच्या गड किल्ल्यांवर डेस्टिनेशन वेडिंग व्हावे म्हणून जी आर काढला.. हे लोक आम्हाला आता शिवभक्ती शिकवणार का?,” असा संतप्त सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला आहे. पाच वर्ष सत्ता असताना छत्रपती संभाजी महाराजांसाठी नेमकं काय केलं हा असंही त्यांनी विचारलं.