“सर्वांनी एकी ठेवली पाहिजे. तसेच संकटावर सगळे एकत्र मिळून मात करू. तसेच महाराष्ट्रातील मराठी माणूस संकटावर एकजुटीने मात करतो हे जगाला दाखवून देऊ,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. आज (शनिवार) शरद पवार यांनी सातारा जिल्हयातील कराड – तांबवे गावाला भेट दिली. यावेळी शरद पवार यांनी पुरग्रस्त ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच आम्ही कायम सर्वाच्या पाठिशी राहू असे सांगत दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

“एवढ्या मोठ्या संकटाला तोंड देण्याची ताकद एकट्या दुकटयाची नाही. राज्य आणि केंद्र सरकार मदतीला धावून यायला हवे. विविध संस्था, व्यक्तींनी मदतीचा हातभार लावायला हवा. तसेच राज्य व केंद्राकडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ,” असे आश्वासन शरद पवार यांनी दिले. गेले पाच दिवस सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्हयाला पुराचा वेढा पडला आहे. गुजरातमध्ये संकट आले, बिहारला दुष्काळ पडला, आसामला पूर आला, त्यावेळी त्यांच्या मदतीला महाराष्ट्र धावला आहे आणि आज महाराष्ट्रावर संकट आले आहे. त्यावेळी सर्वांनी मदतीला आले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रत्येक माणसाला उभं केलं पाहिजे. जबाबदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे. या भावनेतून आम्ही पुढे सरसावलो आहोत असेही त्यांनी नमूद केले आहे.

मी माझ्या पक्षाच्या उल्लेख करणं उचित नाही परंतु राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, खासदार यांनी एक महिन्याचा पगार व जमा झालेला ५० लाखाचा धनादेश आजच मुंबईत मुख्यमंत्री असतील तर तो देण्यात येईल. इतरांना सांगण्यापेक्षा आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे, असेही ते म्हणाले. तसेच राज्य सरकारला मदत करायला, हातभार लावायला विनंती करणार आहोत. शिवाय सर्वात पहिल्यांदा सर्वात गरीब आणि लहान असलेल्या कुटुंबाला मदत कशी पोहोचेल यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेवू आणि त्यासाठी वेगळी यंत्रणा उभी करु करु, असे आश्वासनही पवार यांनी दिले. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री असताना लातुरचा भूकंप झाला होता त्याची आठवण त्यांनी सांगितली. शिवाय शुक्रवारी बारामतीमध्ये १ कोटी रुपये जमा केल्याचे सांगितले.