राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सुनिल तटकरे यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील रुग्णालयात आपण दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

“सोमवारी माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन,” असं तटकरे म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून संदर्भातील माहिती दिली आहे.

अजित पवारांनाही करोना

गेल्या काही दिवसांपासून क्वारंटाइनमध्ये असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अजित पवार यांना करोनाची लागण झाल्याचं निदान झाल्यानंतर रुग्णालयात हलवण्यात आलं. अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर अजित पवार यांना थकवा जाणवू लागला होता. त्यानंतर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं स्वतः क्वारंटाइनमध्ये होते.

सोमवारी ३,६४५ रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात सोमवारी दिवसभरात ९ हजार ९०५ करोना रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४ लाख ७० हजार ६६० इतकी झाली आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आता ८९.२ टक्के इतका झाला आहे. दरम्यान, सोमवारी राज्यात ३ हजार ६४५ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.