महाराष्ट्रातले जिम बंद करण्यात आले आहेत. मात्र आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने आता जिम पुन्हा सुरु करणं आवश्यक आहे. राज्यातील अनेक जिम चालकांनी त्यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे असं म्हणत जिम सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही केली आहे. रामदास इंगळे यांनी यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांना एक पत्र पाठवलं आहे. हे पत्र ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी जिम पुन्हा सुरु करा अशी मागणी ठाकरे सरकारकडे केली आहे.

याआधी काही जिम चालक आणि व्यायामपटूंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि सरकारकडे जिम सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरायची मागणी केली होती. त्यावेळी राज ठाकरेंनी जिम ओपन करा बघू काय होतं असा सल्ला दिला होता. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही जिम सुरु केले गेले पाहिजे अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. आता त्यापाठोपाठ सुप्रिया सुळे यांनीही जिम सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी एका जिम चालकाचं पत्रही ट्विट केलं आहे.

याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जिम सुरु करा अशी मागणी केली होती. एवढंच नाही तर परवाच्या दिवशीच त्यांनी जर राज्यातले मॉल सुरु होऊ शकतात तर मंदिरं का नाही अशीही भूमिका घेतली होती. त्याआधी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. महाराष्ट्रातल्या या दोन प्रमुख नेत्यांनी जिम सुरु करा अशी मागणी केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हीच मागणी केली आहे.