खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

औरंगाबाद : भाजपची एक ‘ब’ टीम जहाल भाषणे करत फिरत आहे. त्याचा कोणाला फायदा होतो? सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे आपले मत कोणाला दिले तर कोणाचा फायदा होईल हे बघायला हवे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. देशात कधी नव्हे ते सरपंच पदापासून ते पंतप्रधान पदापर्यंत सत्ता मिळूनही सत्ताधाऱ्यांना महिला आरक्षण विधेयक आणता आले नाही. पण अल्पसंख्याकांमध्ये तिहेरी तलाकचा एक प्रश्न घेऊन ते मागे लागले आहेत, अशी टीका त्यांनी केली. औरंगाबाद येथे मुस्लिम बुद्धिजीवी वर्गातील व्यक्तींशी हितगूज कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

मुद्रा कर्ज, मेक इन इंडियाचे नारे आणि अन्यही अनेक योजनांमधून नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. दोन कोटी नोकऱ्या देऊ, असे आश्वासन होते. दरवर्षांला या वेगाने नोकऱ्या दिल्या असत्या तर १० कोटी नोकऱ्या झाल्या असत्या. या नोकऱ्या उपलब्ध झाल्या नाही. २०२४ च्या निवडणुकीमध्ये बेरोजगारी हाच सर्व पक्षांसमोरची समस्या असेल, असेही खासदार सुळे म्हणाल्या. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे इलियास किरमाणी म्हणाले, काही लोक जाणीवपूर्वक द्वेष निर्माण करत आहेत. अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहे. मात्र, राष्ट्रवादी पक्षाचा असणारा मुस्लिम वर्ग त्या पक्षाला मतदान करण्याऐवजी अन्य पक्षाकडे का वळला, याचेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

शहरातील विविध भागांत अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींना व संस्थांना खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी भेटी दिल्या. मुस्लिम समाजातील विचारी आणि व्यावसायिकांशी त्यांनी हितगूज केले. यावेळी उलेमा, वकील, डॉक्टर, प्राध्यापक मंडळी उपस्थित होती. तिहेरी तलाक या प्रश्नाविषयी मुस्लिम महिलांनी मत व्यक्त केले. शफक्कन हुसैनी म्हणाल्या, ‘मुस्लिम महिलांचा प्रश्न शिक्षणाशी, बेरोजगाराशी आहे. मात्र, आमच्या धार्मिक गोष्टीत लक्ष घालत आहे. इस्लामचे कायदे अल्लाहने निर्माण केले आहे. त्यात सरकार नाहक नाक खुपसते आहे.’ प्रा. रिझवाना शमीम यांनीही ‘आता हद्द झाली, सहन होत नाही’ या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. रोजगार, शिक्षण, कौशल्यासाठी आवश्यक केंद्र, मौलाना आझाद महामंडळासाठी दिली जाणारी तरतूद याकडे सुप्रिया सुळे यांचे लक्ष वेधले. कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीचा हा कार्यक्रम ‘ब’ टीमला पर्याय मानायचा का? राजकीयदृष्टय़ा राष्ट्रवादीकडून दूर गेलेला मतदार जोडण्यासाठी हे चालले आहे काय, असे विचारले असता खासदार सुळे म्हणाल्या, मी विविध क्षेत्रांतील व्यक्तींना भेटत असते. हे आज करत नाही. ज्या समाजाचे प्रश्न आहे, त्या समाजाकडून ते समजून घेऊन त्यावर मार्ग काढणे हे आमचे काम आहे.