डायलॉगबाजी आणि हटके स्टाईलसाठी नेहमी चर्चेत असणारे साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी एका जाहीर कार्यक्रमात चक्क गाणं म्हटलं आहे. हमे तुमसे प्यार कितना.. ये हम नही जानते.. हे गाणं उदयनराजेंनी गाताच सभागृहात एकच जल्लोष झाला. एका कार्यक्रमात त्यांनी गाणं म्हणून आपल्या कार्यकर्त्यांवरील प्रेम व्यक्त केलं आहे.
साताऱ्यातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, श्वासात श्वास आहे, तोपर्यंत तुमच्यासाठीच जगणार आहे. तुमच्यावर अपार प्रेम करणार आहे. तुमच्यावर अपार प्रेम आहे हे शपथेवर सांगतो. माझ्यात कसलाही बदल होणार नाही. फक्त तुम्ही तुमच्यात बदल करु नका. काय कमवायचं आणि काय गमवायचं? आयुष्यातील बरीच वर्षे निघून गेली. हाफ चड्डीतले दिवस निघून गेले. कॉलेजला असताना दांड्या मारायचो पण कमवली ती मैत्री.
नंतर भाषण ऐकून तुम्ही कंटाळला असाल तर गाणं ऐकायचं का, असा सवाल करत त्यांनी थोडा आवाज बसलाय असे म्हणत, गाणं म्हणायला सुरुवात केली. हमे तुमसे प्यार ए कितना, हम नही जानते… मगर जी नही सकते तुम्हाला बिना..कोई तुमसे भी.. कोई तुमसे.. हे म्हटल्यानंतर उदयनराजेंना गाण्याचे बोल आठवले नाहीत. त्यामुळे ते थोडं पुटपुटले. त्यांच्या या गाण्याला टाळ्या आणि शिट्टया वाजवून उपस्थितांनी दाद दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 12, 2019 9:12 pm