News Flash

राजकारणातून अलिप्त व्हावं असं वाटतंय – उदयनराजे भोसले

साताऱ्यात उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राजकारणातून अलिप्त व्हावं असं वाटत आहे असं सूचक विधान केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात जायचे असं काही नक्की नाही आणि असं काही असेल तर तुम्हाला नक्की सांगतो”, असं उदयनराजे यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजीराव भिडे गुरुजी यांनी आज सातारा येथे उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस येथे भेट घेतली. यावेली उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचं समजतं. मात्र यावेळी राजकारणातून अलिप्त व्हावं असं वाटत आहे असं वक्तव्य केल्याने तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

राजकारणातील नवीन समीकरणे सुरू करत असल्याने भिडे गुरुजी तुमच्या भेटीला आलेत का ? असं विचारलं असता उदयनराजे यांनी हे माझे एकट्याचे घर नाही, भेटायला आले होते असं सांगितलं. राजकारणातून अलिप्त व्हायचा विचार करतोय असंही त्यांनी यावेळी म्हटलं. भाजपा प्रवेशाची तारीख कधी निश्चित होईल ? या प्रश्नावर त्यांनी नाही रे अजून काहीही नाही असे सांगून या प्रश्नाला बगल दिली. तर आता राजकारणापासून अलिप्त व्हायचा विचार करतोय, असं सांगत तुमच्या सारख्या मित्रांसमवेत राहायचा विचार करतोय असं सांगितलं.

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीला पोहोचले होते. जलमंदिर पॅलेस येथे ही भेट घेण्यात आली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. खासदार उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याचं बोललं जात आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर संभाजी भिडे आणि त्यांच्या समर्थकांचा पाठिंबा मिळावा यासाठी उदयनराजे प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. आता साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर ते हा निर्णय घेत असल्याचे बोलले जात आहे. भाजपाच्या या प्रयत्नांना जर यश आले तर शरद पवारांना हा मोठा धक्का असू शकतो. शिवाय हक्काचा सातारा जिल्हा देखील राष्ट्रवादीच्या ताब्यातून गेल्यात जमा होऊ शकतो.

उदयनराजे भाजपात आल्यास आनंदच होईल-मुख्यमंत्री
उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले भाजपात आले तर आम्हाला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया दिली होती. भाजपात यायचं की नाही सर्वस्वी निर्णय उदयनराजे यांचाच आहे मात्र ते भाजपात आल्यास आम्हाला निश्चितपणे आनंद होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 4:19 pm

Web Title: ncp mp udyanraje bhosale talks to media in satara sgy 87
Next Stories
1 मुंबई गँगरेप प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, राष्ट्रवादीची मागणी
2 पद्मसिंह पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारताच पत्रकार परिषदेत भडकले शरद पवार
3 संभाजी भिडे गुरुजी उदयनराजेंच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
Just Now!
X