18 November 2017

News Flash

शिवसेनेचे आणखी दोन आमदार भाजपवासी?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा पुनरुच्चार

संजीव कुळकर्णी, नांदेड | Updated: September 11, 2017 2:47 AM

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा पुनरुच्चार

लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ‘करामतीं’मुळे या पक्षाला नांदेडमध्ये घरघर लागलेली असतानाच शिवसेनेचे जिल्ह्य़ातील आणखी दोन आमदार भाजपवासी झाल्यात जमा आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

नांदेड-वाघाळा मनपाची निवडणूक जाहीर होण्याच्या दीड महिना आधी मलिक यांनी नांदेड जिल्ह्य़ातील  शिवसेनेचे तीन आमदार भाजपात जाणार असल्याचा तसेच यापकी एका आमदाराकडे मनपा निवडणुकीत भाजपाच्या प्रचाराचे नेतृत्व सोपविले जाणार असल्याचा गौप्यस्फोट मुंबईत केला होता. त्यावर शिवसेना नेतृत्वाने कोणताही खुलासा केला नव्हता; पण मलिक यांचे भाकीत आमदार चिखलीकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून सत्यात उतरविले असून भाजपच्या नांदेडमधील मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन रविवारी चिखलीकरांच्या हस्ते पार पाडण्यात आले.

या कार्यक्रमाच्या उपस्थितांमध्ये सूर्यकांता पाटील, भास्करराव खतगावकर, डॉ. माधव किन्हाळकर, ओमप्रकाश पोकर्णा आदी दिग्गजांची नावे जाहीर करण्यात आली होती; पण या सर्वाची गरहजेरी दिसून आली. डॉ. धनाजीराव देशमुख मात्र कार्यक्रमास हजर होते.

भाजपाच्या निवडणूकविषयक बाबींची सारी सूत्रे आमदार चिखलीकर आणि त्यांचे मेव्हणे श्यामसुंदर शिंदे यांच्याकडे एकवटल्याचे एव्हाना स्पष्ट झाले असून मनपा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. भाजपाचे महानगर कार्यालय गोवर्धन घाट भागात कार्यरत झालेले असताना मनपा निवडणुकीसाठी या पक्षाने कौठा भागातील एक सुसज्ज मंगल कार्यालय महिनाभरासाठी भाडेतत्त्वावर घेतले आहे.

मुंडे, मलिक आज नांदेडात

‘राष्ट्रवादी’चे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह पक्षप्रवक्ते नवाब मलिक सोमवारी येथे दाखल होत आहेत. तत्पूर्वी ‘लोकसत्ता’शी बोलताना मलिक यांनी पुढील काळात शिवसेनेचे आणखी दोन आमदार भाजपात जातील, असे सांगितले. नांदेड मनपा निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक सत्ताधारी काँग्रेस पक्ष आणि भाजपात ‘पोस्टर युद्ध’ सुरू झाले आहे. काँग्रेसने गेल्या शुक्रवारी मोठा कार्यक्रम घेऊन आपली सिद्धता दाखवून दिली; पण दुसऱ्या बाजूला शिवसेनेत सन्नाटा निर्माण झाला असून पक्षाच्याच एका आमदाराने भाजपाचे कमळ हाती घेतले तरी पक्षनेतृत्वाने त्यावर कोणतेही भाष्य केले नाही.

काँग्रेसची मक्तेदारी मोडण्याचा निर्धार

भाजपच्या येथील कार्यक्रमात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड-वाघाळा मनपातील काँग्रेसची मक्तेदारी मोडून काढण्याचा तसेच मनपाची सत्ता भाजपच्या हाती आणण्याचा निर्धार केला. महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे, धनाजीराव देशमुख, चतन्यबापू देशमुख यांची यावेळी भाषणे झाली. परंतु दिलीप कंदकुत्रे व पक्षात घरवापसी केलेले माजी उपमहापौर सुनील नेरलकर यांना मात्र भाषणाची संधी मिळाली नाही. शिवसेनेचे विनायक सगर, नगरसेवक अशोक उमरेकर हेही कार्यक्रमाला हजर होते, तर माजी नगरसेवक ईश्वर येमुल यांनी भाजपात प्रवेश केला.

 

First Published on September 11, 2017 2:47 am

Web Title: ncp nawab malik comment on shiv sena