‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणेवर हात वर करुन दाखवा अशी मागणी भाजपा आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांनी अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्याकडे विधीमंडळात केली. यावेळी भाई गिरकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणेवर नवाब मलिक यांनी हात वर केला नव्हता असा आक्षेपही घेतला. नवाब मलिक यांनी भाई गिरकर यांना यावेळी उत्तर देत टोला लगावला.

नेमकं काय झालं ?
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन शाब्दिक चकमक सुरु आहे. सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरु असताना भाजपाचे विधान परिषदेतील आमदार भाई गिरकर यांनी नवाब मलिक यांना प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणेवर हात वर करुन दाखवा अशी मागणी केली. यानंतर भाजपा आमदारांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष सुरु केला.

भाई गिरकर यांनी यावेळी नवाब मलिक यांच्या व्हायरल क्लिपचा उल्लेख केला. मागे नवाब मलिक यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणेवर हात वर केला नसल्याचं दिसत होतं असंही भाई गिरकर यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा – शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारचा दणका

नवाब मलिकांचं उत्तर –
भाई गिरकर यांच्या मागणीवर उत्तर देताना नवाब मलिक यांनी टोला लगावत म्हटलं की, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ही घोषणा हात वर करुन देता येत नाही. हा तुमचा गैरसमज आहे. ती तोंडाने देता येते, तुम्ही हाताने देऊन दाखवा’.