शिवसेनेने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापण्याचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावेळी काँग्रेसने हा प्रस्ताव धुडकावला होता असंही सांगितलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे राज्यात राजकीय भूकंप आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी यावर बोलताना शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला कोणताही प्रस्ताव दिला नव्हता असं स्पष्ट केलं आहे.
“शिवसेनेचं पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत बोलणं झालं असेल पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नव्हतं. काँग्रेस एक वेगळा पक्ष आहे. त्यांना प्रस्ताव आला असावा. पण निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसला असा कोणताही प्रस्ताव आला नव्हता,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा – ‘पाच वर्षांपूर्वीच शिवसेनेकडून काँग्रेसला सत्तेचा प्रस्ताव’
पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले ?
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत विरोधी विचारसरणी असतानाही शिवसेनेशी आघाडी करावी, असे काँग्रेसला का वाटले? असे विचारता, चव्हाण यांनी २०१४ मधील राजकीय स्थितीचा दाखल दिला. भाजपाला रोखण्यासाठी आघाडी सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीने माझ्याकडे संपर्क साधला. मात्र, मी तातडीने हा प्रस्ताव फेटाळला. राजकारणात जय-पराजय असतातच, आम्ही निवडणूक हरल्याने विरोधात बसणार हे त्यावेळी स्पष्ट केले होते. आताही शिवसेनेसोबत सत्ता स्थापण्यास कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उत्सुक नव्हत्या. मात्र, चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर त्यांनी अनुकूल भूमिका घेतली, असे चव्हाण यांनी सांगितले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळपास ४० आमदारांना पक्ष बदलण्यासाठी धमक्या किंवा आमिषे दाखविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भाजप-सेनेतील वाद पाहता या परिस्थितीत आम्ही आमची भूमिका बदलण्याचे ठरविले आणि पर्यायी सरकारबाबत विचार सुरु केला. मी यात पुढाकार घेतला, त्यानंतर चर्चा सुरु झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी यांनी सांगितले. सरकार कार्यकाळ पूर्ण करणार का, याबाबत पूर्ण हमी कोणीच देऊ शकणार नाही. मात्र, भाजपाने विरोधकांना संपविण्याचा केलेला प्रयत्न आणि शिवसेनेचा केलेला विश्वासघात यामुळे एकत्र आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली नसल्याबाबत विचारले असता, काहीशा दुय्यम स्थानावर काम करणे मला योग्य वाटले नाही, असे चव्हाण म्हणाले. विधासभा अध्यक्षपदाचा प्रस्ताव मला देण्यात आला होता. मात्र राजकारणात सक्रिय रहायचे असल्याने मी तो मान्य केला नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. भविष्यात पक्षनेतृत्व जी जबाबदारी देईल ती स्वीकारू, असे चव्हाण यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2020 11:03 am