News Flash

अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार?; राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसकडून निष्पक्ष भूमिका

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे सध्या राज्यात खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र जोपर्यंत तपास पूर्ण होऊन सत्य समोर येत नाही तोपर्यंत राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एबीपी माझाशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर देत पक्षाची भूमिका मांडली.

“परमबीर सिंह यांनी बदली झाल्यानंतर पत्र लिहिलं आहे. कुठेतरी जाणुनबुजून हा पुरावा तयार करण्यात आला असं दिसत आहे. पत्रात तारखांचा जो उल्लेख आहे त्याबद्दल बोलायचं गेल्यास अनिल देशमुख फेब्रुवारीच्या सुरुवातीला जनसंवाद यात्रेत होते. त्यानंतर करोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे १५ तारखेपर्यंत रुग्णालयात होते. त्यानंतर २७ तारखेपर्यंत क्वारंटाइन असताना कोणाला भेटले नाहीत. अनिल देशमुख वाझेंना फेब्रुवारी अखेरला भेटले असं परमबीर सिंह सांगत आहेत,” असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “यासंबंधी तपास होणं गरजेचं आहे. आरोपांमध्ये सत्य किती आहे याची माहिती घेतल्याशिवाय राजीनामा द्या अशी मागणी करणं सोपं आहे. पण बिनबुडाचे आरोप कोणीही करु शकतो. त्यासाठी पक्षाने निष्पक्ष भूमिका घेतली आहे. तपास होईल, त्यानंतर सत्य समोर येईल आणि मग कारवाई केली जाईल”.

या राज्याने अनेक मुख्यमंत्र्यांना छोट्या चुकांसाठी घरी पाठवलं आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले की, “कालपर्यंत मोठी चूक वाटत होती आणि आता छोटी चूक म्हणत आहे, म्हणजे कुठेतरी भाजपाला यामध्ये काही तथ्य निघणार नाही असं दिसत आहे. शरद पवारांनी काहीतरी शिजल्यानंतर हे आरोप होत असल्याचं सांगितलं आहे. तपास होऊ द्या, जे सत्य आहे त्यापद्धतीने पुढील कारवाई होईल. सध्या राजीनामा घेण्याची गरज नाही अशी स्पष्ट भूमिका पक्षाने घेतली आहे. आरोप गंभीर असले तरी सत्य आहेत की नाही तपासणं गरजेचं आहे. पत्राबाबत शंका असून तपास पूर्ण होईपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाही”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 9:31 am

Web Title: ncp nawab malik home minister anil deshmukh parambir singh sgy 87
Next Stories
1 परमबीर सिंह प्रकरण: पवारांच्या ‘त्या’ मागणीला माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरोंनी दिलं उत्तर; म्हणाले…
2 “…त्याच परमबीर सिंगांना भाजपावाले खांद्यावर घेऊन लग्नाच्या वरातीत नाचावे तसे नाचत आहेत”
3 राज्यात बाधितांचे प्रमाण २० टक्क्यांवर
Just Now!
X