न्यायालयसुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही कुठेतरी संपली असं जाहीर करा. अन्यथा चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जामीनावर सुटला आहात, फार महागात पडेल अशी धमकी दिली आहे. यावरुन नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका केली.

“जामीनावर सुटला आहात,” ममता बॅनर्जींचं कौतुक केल्याने चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना धमकीवजा इशारा

“भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अशा पद्धतीने बोलत असतील तर न्यायालयाने सुमोटोअंतर्गत कारवाई करावी,” अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. “आजपर्यंत भाजपाकडून यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात येत आहे हे सिद्ध झालं आहे. आता न्यायालयसुध्दा त्यांच्या बोलण्यावर काम करतेय का?,” असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे.

“छगन भुजबळ यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे,” अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते –
ममता बँनर्जींचं कौतुक केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळांना धमकीवजा इशारा दिला होता. “छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी. कशाला बंगाल वैगेरे….जिथे आहात तिथा बोला ना…जामीनावर सुटला आहात, अजून निर्दोष सिद्ध झालेला नाहीत. त्यामुळे फार जोरात बोलू नका, अन्यथा फार महागात पडेल,” असा इशाराच चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. बोलायचंच असेल तर पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडूवर बोला असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.

भुजबळांचं उत्तर
“चंद्रकांत पाटील यांनी पराभवसुद्धा सहन करण्याची शक्ती ठेवली पाहिजे. त्यांच्या दुर्दैवाने यापुढे वारंवार त्यांना पराभवाचे फटके बसणार आहेत. त्यामुळे पराभव सहन करण्याची शक्ती ठेवून त्यांनी थोडं सांभाळून बोललं पाहिजे,” असा सल्ला भुजबळांनी दिला आहे. “माझ्या केसेस कोर्टात असताना ते महागात पडेल असं म्हणत असतील तर त्याचा काय अर्थ समजायचा. ईडी, सीबीआय यांना जसं हातातील शस्त्र म्हणून वापरत आहेत तसं आता न्यायपालिकाही हातात आहे असं सुचवायचं आहे का?,” अशी विचारणा भुजबळांनी केली.