राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला असून ठाकरे सरकार लॉकडाउन वाढवणार की उठवणार यासंबंधी सध्या चर्चा सुरु आहे. करोनाला आटोक्यात आणण्यासाठी ठाकरे सरकारने कठोर निर्बंध जाहीर केले असून परिस्थिती नियंत्रणात नसल्याने लॉकडाउन वाढवण्यात आला होता. पण सध्या दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत असल्याने लॉकडाउन शिथील करण्याची मागणी होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ठाकरे सरकार लॉकडाउन उठवणार की नाही याबाबत साशंकता आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत महत्वाचं विधान केलं आहे.

“लॉकडाउन कधीही उठू शकतो, पण…,” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं महत्वाचं विधान

“राज्यात ३१ तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे. राज्यातील १५ जिल्हे असे आहेत जिथे पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. काही जिल्ह्यात तीन ते पाच टक्के प्रमाण आहे. सरसकट लॉकडाउन उठवता येत नाही. परिस्थितीचा आढावा घेऊनच लॉकडाउनसंदर्भात निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाउन सरसकट उठवणं अडचणीचं ठरेल. निर्बंध शिथील करण्यासंबंधी मुख्यमंत्री ३१ मे च्या आधी निर्णय घेतील,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं आहे –
महाराष्ट्रात करोना स्थितीसंबंधी विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले होते की,“सध्याचा करोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील,” असंही ते म्हणाले. दरम्यान लॉकडाउन वाढणार का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीहा गाफील राहू नये”.

राजेश टोपेंनी काय म्हटलं आहे –
“आपण तयारीचा आढावा घेणार आहोत. जर सर्व गोष्टी सकारात्मक असतील तरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री टास्क फोर्समधील तज्ज्ञांशी चर्चा करत निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा विचार करु शकतात. निर्बंध पूर्णपणे उठवले जातील या भ्रमात राहू नका,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन
ठाकरे सरकार टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथील करण्याची योजना आखत असल्याचं वृत्त इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
पहिला टप्पा – दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाईल.
दुसरा टप्पा – दैनंदिन गरजांशी संबंधित अन्य काही दुकानांना सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. पर्यायी दिवसांवर ही दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल,.
तिसरा टप्पा – हॉटेल्स, परमिट रुम, बिअर बार, दारुच्या दुकानांना निर्बंधासह सुरु ठेवण्यास परवानगी असेल. हॉटेल्सना ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाईल.
चौथा टप्पा मुंबई लोकल, धार्मिक स्थळं, जिल्हाबंदी पुढे ढकलली जाऊ शकते.

१ जूनपासून कशावर असेल बंदी, कशात सूट? अस्लम शेख यांनी दिले संकेत!
मुंबईसंदर्भात विचार करता लसीकरणाचा आकडा अजूनही कमी असल्यामुळे नियमांमधून कोणत्या गोष्टींना मुभा देण्यात येईल, याविषयी देखील अस्लम शेख यांनी संकेत दिले आहेत. “लॉकडाउनमघ्ये कोणते बदल करायचे, कोणती दुकानं उघडायची, एसीची दुकानं, सलून, इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांना निर्बंधांतून वगळता येईल का? अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी असणाऱ्या सेवांमध्ये अजून वाढ करता येईल का? याची चाचपणी सुरू आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोविड टास्क फोर्सकडून अभ्यास करून शिफारशी केल्या जातील. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यावर निर्णय घेतला जाईल”, असं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.