गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे हे शोधण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यांची हत्या कशी झाली याची चौकशी झालीच पाहिजे. आमची सत्ता आल्यास गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात बुलढाणा जिल्हयातून झाली. त्यानंतर औरंगाबाद, जालना, परभणी जिल्हयातून गुरुवारी हिंगोली जिल्हयात परिवर्तन संपर्क यात्रा दाखल झाली. हिंगोलीतील वसमतनगर येथे प्रचंड गर्दीमध्ये सभा पार पडली. या सभेत जयंत पाटील यांनी सत्ताधारी भाजपावर टीका केली. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूसंदर्भातही भाष्य केले. ते म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. लोकनेत्याचा ईव्हीएम प्रकरणात मृत्यू होत असेल तर हे चांगले नाही. आमची सत्ता आल्यास गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येची सखोल चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांनी कर्जमाफी देतो असे सांगून पाच वर्षे झाली. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देतो असे सांगितले होते. या दोघांनाही आता जनतेचा विसर पडला आहे. त्यामुळे यांच्यावर विश्वासच राहिला नाही, असा टोला त्यांनी लगावला. या देशात शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी देणारे शरद पवार हे एकमेव नेते आहेत. परंतु या सरकारने शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही, असा आरोप त्यांनी केला.

पाच वर्ष झाली काळा पैसा आलेला नाही. या सरकारने फसवल्याचे देशातील जनतेला वाटत आहे. आता हीच जनता या सरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या पापात शिवसेनेचा ५० टक्के वाटा आहे. निव्वळ विरोध करण्याचे काम करत आहेत. जर विरोध करत आहात तर सत्ता का सोडवत नाही असा सवालही पाटील यांनी शिवसेनेला विचारला. पाच राज्यात साम दाम दंड भेद वापरूनही भाजपाचा पराभव झाला आहे त्यामुळे आता विविध प्रकारची आश्वासने द्यायला लागले आहेत, असे त्यांनी नमूद केले. भाजपा सरकार या देशात विकास करण्यात अपयशी ठरली आहे. नोकर्‍या देण्यात अयशस्वी आणि आश्वासनांचे गाजरं दाखवण्यात यशस्वी झाले आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.