News Flash

मुंबई-गोवा महामार्गावरील टोलच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीचा विरोध

स्वातंत्र्यानंतर प्रथमच वैचारिक पातळीवर मुकाबला करण्याची वेळ आली आहे. पंतप्रधानांनी परदेशी दौऱ्यात भारताच्या गौरवशाली वाटचालीबाबत कायमच संभ्रमता निर्माण करणारी वक्तव्ये केलेली आहेत.

| August 20, 2015 02:28 am

स्वातंत्र्यानंतर प्रथमच वैचारिक पातळीवर मुकाबला करण्याची वेळ आली आहे. पंतप्रधानांनी परदेशी दौऱ्यात भारताच्या गौरवशाली वाटचालीबाबत कायमच संभ्रमता निर्माण करणारी वक्तव्ये केलेली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने पुढील काळात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलने करावीत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री सुनील तटकरे यांनी केले. कोकणचा मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर टोल उभारला गेल्यास राष्ट्रवादीचा प्रखर विरोध राहील. त्यासाठी आंदोलनात्मक लढा उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.
शरद कृषी भवन आरोस या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा मेळाव्यात सुनील तटकरे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर युवक प्रदेशाध्यक्ष आम. निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, पक्ष निरीक्षक शरद कुलकर्णी, जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, अबीद नाईक, अमित सामंत, अशोक पराडकर, रत्नागिरी जिल्हा बँक उपाध्यक्ष बाबाजी जाधव, प्रफुल्ल सुद्रीक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना फलोद्यानसह कृषी योजना राबवून उत्पादन वाढविले आहे, पण केंद्र व राज्य सरकारने आता शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेले आहे. शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूदही केलेली नाही. भाजप-शिवसेना सरकार शेतकरीविरोधक आहे, असे सुनील तटकरे म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारात बाळासाहेब यांच्या शब्दाला किंमत होती. त्या वेळी राज्यातील शिवशाही सरकारचा रिमोटकंट्रोल बाळासाहेबांच्या हाती होता, पण आता उद्धव ठाकरे यांच्या शब्दाला केंद्र व राज्याच्या सरकारमध्ये किंमत नाही असे सुनील तटकरे यांनी बोलताना स्पष्ट केले.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे म्हणायचे आणि दुसरीकडे भाजपसोबत शिवसेने सत्तेचे समीकरण ठेवायचे हा दुटप्पीपणा आहे. सध्याचे राज्य सरकार कोकण, मराठवाडय़ावर अन्याय करत असून, हे सरकार फक्त विदर्भाचे आहे, असा टोला तटकरे यांनी हाणला. राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे नाव टाळत त्यांनी शरद पवार व राष्ट्रवादीसोबत राहून मानसन्मान मिळवून गद्दारी केली. खऱ्या अर्थाने सावंतवाडी, वेंगुर्ले नगरपरिषदेसह जिल्ह्य़ाला आम्ही निधी दिला आहे. सावंतवाडीचा विकास खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीनेच केल्याचा टोला तटकरे यांनी हाणला.
दोडामार्ग, कुडाळ व वैभववाडी नगरपंचायत निर्णय आघाडी सरकारच्या काळातच आम्ही घेतला, पण आता ते श्रेय घेत आहेत. या निवडणुकीत समविचारी पक्षांशी आघाडी करण्यात येईल, असे सुनील तटकरे म्हणाले. तटकरे यांनी केंद्र व राज्य सरकारसह शिवसेना, भाजपविरोधात जोरदार टीका केली. या वेळी प्रदेश युवक अध्यक्ष आम. निरंजन डावखरे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, पक्ष निरीक्षक शरद कुलकर्णी, अबीद नाईक, अमित सामंत यांनीही मार्गदर्शन केले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांनी राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणानंतर टोलवसुलीला विरोध आहे. सरकारविरोधात कायमच संघर्ष करू असे स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 2:28 am

Web Title: ncp opposed mumbai goa highway toll proposal
टॅग : Ncp
Next Stories
1 माजी कुलगुरू प्रा. मूर्ती यांचे निधन
2 पाण्यासाठीच पावसाकडे लक्ष
3 आत्महत्याग्रस्त शेतक ऱ्यांच्या कुटुंबीयांना आपचा दिलासा
Just Now!
X