देशात पहिल्यांदाच सत्तेचा अतिरेक होताना दिसत आहे. देशातील सर्वोच्च संस्थांमध्ये हस्तक्षेप केला जात आहे. विरोधकांना नाउमेद करण्याची भूमिका विद्यमान सरकार घेत असून देशात आणीबाणी सदृश स्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर केला आहे. तसेच मिशेलने सोनिया गांधींचे नाव घेणे हा कटाचाच भाग असल्याचेही त्यांनी म्हटले.
नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या ४ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. सीबीआयसारखी सर्वोच्च तपास संस्थाही यापासून दूर राहिली नाही. क्रमांक एकचे अधिकारी आणि क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप आहेत. प्रकरण न्यायालयात गेले आहे. तीच गत आज भारतीय रिझर्व्ह बँकेची झाली आहे. रघुराम राजन यांनी राजीनामा दिला. मोदींनी गुजरातेतून उर्जित पटेल यांना आणले. पण त्यांच्याबरोबर यांचे जमले नाही. आरबीआयच्या पैशावर यांचा डोळा होता. त्याला पटेल यांनी विरोध केला. अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला. आताही त्यांनी त्यांचाच माणूस बसवला आहे. आपल्या संस्था डळमळीत होत आहेत. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते.
आज विरोधकांना नाउमेद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऑगस्ट वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी तुरूंगात असलेल्या ख्रिश्चियन मिशेलने सोनिया गांधी यांचे नाव घेणे हा कटाचाच भाग आहे. त्याने सोनियांचे नाव घेतले. हे कोण ऐकले आहे ? इडीच्या अधिकाऱ्याने ते ऐकले आणि त्याने सर्वांना सांगितले की मिशेलने सोनियांचे नाव घेतले. ते खरे आहे की नाही याची कोणालाच माहिती नाही.
आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले की, देशात परिवर्तन पाहिजे. त्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. आम्ही राज्या-राज्यांमध्ये आघाउी करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक राज्यात वेगळी स्थिती आहे. तेथील परिस्थितीनुसार ते-ते पक्ष तेथे क्रमांक एकवर असतील. आमचा नेता आत्ताच सांगण्याची काहीच गरज नाही. निवडणुकीनंतर आम्ही एकत्र बसू आणि मग नेता ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत काही पक्षांनी पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांचे हे वक्तव्य महत्वाचे आहे. आम्ही देशाला स्थिर सरकार देऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तसेच राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४० जागांवर एकमत झाले असून ८ जागांसाठी चर्चा सुरू आहे. तोही प्रश्न लवकरच निकाली लागेल. त्यामुळे आमच्यात जागावाटपावरून कोणताही गोंधळ नाही, असे त्यांनी म्हटले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 30, 2018 3:15 pm