मराठा समाजाचं आरक्षणं हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलं असून यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत असल्याचा आरोप भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. तेच नेते आता सत्तेत आहेत. अजून किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहणार आहात, असा सवालही उदयनराजे भोसले यांनी केला आहे. दरम्यान उदयनराजेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते कर्जतमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

“ते नेमकं काय बोलले हे मला माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण आज एकमेकांवर टीका करण्याची गरज नाही. एकत्र राहून आरक्षणाच्या बाबतीत मार्ग काढावा लागेल. कोणाला श्रेय घ्यायचं नाही. लाखो लोक गेली कित्येक वर्ष लढत आहेत त्यांना श्रेय जाणार आहे. लवकरात लवकर प्रश्न मार्ग लागेल असा विश्वास आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “गोपीचंद पडळकरांची योग्यता…,” रोहित पवारांनी दिलं उत्तर

उदयनराजेंनी काय म्हटलं –
“मी माझ्यावतीनं नाही तर आपल्या पिढीच्यावतीनं आपल्या आगोदरच्या पिढीतील सर्व राजकीय नेत्यांना प्रश्न विचारायचा आहे की, मराठा समाजाचा प्रश्न तुम्ही प्रलंबित का ठेवला? मला विचाराल तर फक्त राजकारणासाठी आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला. यावर आजवर कुणी खुलासा केलेला नाही, आधीच्या पिढीतील लोकांना आपण मतदान केलं त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याचा सर्वांना अधिकार आहे,” असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- …तर फडणवीसांच्या हातात सत्ता द्या; उदयनराजेंचं राज्य सरकारला थेट आव्हान

“जोपर्यंत आपण मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत बघणार आहात. तुम्ही हा प्रश्न सोडवला नाहीत पण त्याचं उत्तर दिलं पाहिजे. उद्या आपली पिढी आपल्याला जाब विचारेल तेव्हा कुठल्या तोंडान त्यांना उत्तर द्याल, शरमेनं मान खाली घालावी लागेल. हा प्रश्न त्यांनीच मार्गी लावला पाहिजे कारण अजूनही तेच सत्तेत आहेत,” अशा शब्दांत उदयनराजेंनी सत्तेतील मराठा नेत्यांनाही सवाल केला आहे.

आणखी वाचा- मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला; उदयनराजेंचं ज्येष्ठ नेत्यांवर टीकास्त्र

दरम्यान यावेळी रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावरही टीका केली आहे. “एकदा माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी तुम्ही म्हणताय तसंच बालिशपणाचं, कमी अभ्यास करुन वक्तव्य केलं होतं. त्याला मी उत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा त्यांनी असंच एक वक्तव्य केलं, ज्याकडे मी दुर्लक्ष केलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी इतकी वक्तव्यं केली. त्याच्यात कोण छोटा कोण छोटा हेदेखील त्यांनी सांगितलं. त्यांनी आपलं मन आणि जिगर दाखवून दिलं आहे. त्यांच्याइतके मोठे नेते खालच्या पातळीवर येत असतील तर आम्ही मोठ्याच नेत्याला दुर्लक्ष करत असू तर अशी वक्तव्यं करुन मोकळे होतात त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. माझ्या कार्यकर्त्यांनीच मला हे सांगितलं आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

“त्यांची योग्यता लोकांनी ठरवावी. एखादं वक्तव्य केल्यानंतर त्यानंतर त्यावर काय प्रतिक्रिया येतात त्याचा त्यांनी अभ्यास करावा. त्यावरुनच त्यांची योग्यता कळेल. याशिवाय जास्त काही बोलायचं नाही,” असंही ते म्हणाले.