आजोबा शरद पवारांनी कोणत्याही संकटापुढे झुकायचं नाही असं शिकवलं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नातू रोहित पवार यांनी सांगितलं आहे. अनेक जणांना वाटायचं की पवारसाहेब निवृत्त होतील. पण शरद पवार यांनी कोणत्याही संकटापुढे झुकायचं नाही हे शिकवलं असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “अनेक लोकांना शरद पवार निवृत्त होतील असं वाटलं होतं. पण ते म्हणाले आपण हार मानायची नाही. कितीही संकटं आली तरी झुकायचं नाही, प्रामाणिक वागा, लोकांमध्ये जा, मग कोणीही तुमचा पराभव करु शकत नाही, हे पवार साहेबांकडे पाहून आम्हाला कळतं”.

अहमदनगरमधील संगमनेर येथे अमृतवाहिनी महाविद्यालयातील युवा सांस्कृतिक महोत्सवात तरुण आमदारांशी संवाद साधण्यात आला. दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी ही मुलाखत घेतली. धीरज देशमुख, आदिती तटकरे, आदित्य ठाकरे, रोहीत पवार, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील हे सर्व तरुण आमदार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी सर्व आमदारांनी दिलखुलास चर्चा करत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

हडपसरचे जावई असूनही कर्जत जामखेडमधून निवडणूक का ?
यावेळी अवधूत गुप्ते यांनी रोहित पवार यांनी हडपसरचे जावई असूनही कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला? असा मिश्कील प्रश्न विचारला. यावर रोहित पवार यांनी ज्यांचं लग्न झालं आहे, त्यांना कळेल सासुरवाडीचं गणित जमवणं किती अवघड असतं असं सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

आणखी वाचा – तुमचं हे उत्तर मला ‘पटानी’ म्हणणाऱ्या अवधूतला अदित्य म्हणाले…

मी जिंकलो म्हणून वडिलांच्या डोळ्यात पाणी नव्हतं
“मी जिंकलो म्हणून वडिलांच्या डोळ्यात पाणी नव्हतं. तर मला इतकं बहुमत मिळालं म्हणून वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं. विजयात माझ्या आईचा वाटा मोठा आहे. कारण आईच स्वतः मतदारसंघात गेली होती. लोकांचा विश्वास तिने संपादन केला. आईला खोटं आवडत नाही. तिने विकासाचा शब्द दिला, तो मी पूर्ण करणार”, असा निर्धार रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.