विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला अजून एक धक्का बसला असून सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. सोमवारी झालेल्या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश करावा असा प्रस्ताव कार्यकर्त्यांनी मांडला होता. भाजपा प्रवेशाचा सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांच्या विचाराचाच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगत एकप्रकारे भाजपात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेतच दिले.

राजीनामा दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितलं की, “मतदारसंघातील कामं न झाल्याने आपण आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे. आज संध्याकाळी कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. भाजपासोबत जाणं जास्त योग्य होईल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे”. पुढे बोलताना त्यांनी आपण शरद पवारांचा शब्द डावलत नसल्याचंही सांगितलं तसंच मी भाजपाकडे कोणतीही मागणी केलेली नाही. “माझं प्राधान्य मतदारसंघ आणि त्यातील कामाला असेल”, असं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येईल याबाबत शंका आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान शनिवारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रात्री उशिरा पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी शिवेंद्रराजेंनी आजवर आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. या भेटीत शरद पवार यांनी ‘उदयनराजेंचे मी बघतो, तुम्ही पक्ष सोडू नका’, अशा शब्दात शिवेंद्रसिंहराजेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. बैठकीनंतरही शिवेंद्रराजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे वृत्त आहे.

सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार व माजी मंत्री स्व. अभयसिंहराजे भोसले यांचे सुपुत्र शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार या बातमीने राष्ट्रवादी काँग्रेस पुरती घायाळ झाली आहे. शरद पवार यांनी सुमारे दीड तास शिवेंद्रसिंहराजेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ‘उदयनराजेंचं मी बघतो, तुमची पक्षाला आवश्यकता आहे, तुम्ही पक्ष सोडू नका’, अशा शब्दांत पवारांनी शिवेंद्रराजेंना सबुरीचा सल्ला दिला.

मात्र, आपण ३१ जुलै रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला आहे. कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत मला जावं लागेल, असं शिवेंद्रसिंहराजेंनी पवारांना सांगितल्याचे समजते. एकंदर शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतरही शिवेंद्रसिंहराजे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे वृत्त आहे.

सातारा जावळीचे विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशाबाबत आज सातारा शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थिती बैठक झाली. यात भाजपात प्रवेशाचा सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांच्या विचारांचाच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगत भाजपा प्रवेशाच्या चर्चेस दुजोरा दिला. सातारा शहरातील समर्थकांचे मत जाणून घेण्यासाठी सुरूची बंगल्यावर त्यांनी बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा बॅंकेचे संचालक प्रकाश बडेकर, प्रकाश गवळी, नासीर शेख, अशोक मोने, अॅड. डी. आय. एस. मुल्ला, रामभाऊ साठे, हेमंत कासार यासह पालिकेतील नगरविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवेंद्रसिंह राजेंनी भाजपात प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला याचा सातारा जिल्ह्यात मोठा फटका बसणार आहे. अनेक सत्ता स्थानातून राष्ट्रवादी पक्ष पाय उतार होऊ शकतो. त्यामुळेच शिवेंद्रसिंह राजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडू नये, याकरता राष्ट्रवादी पक्षाचे अनेक बड़े नेते त्यांची मनधरणी करत आहेत. मात्र आमदार शिवेंद्रराजे कार्यकर्त्यांच्या मताच्या बाजूने असल्याने त्यांना आता राष्ट्रवादीत रोखणे आवघड झाले आहे.