राष्ट्रवादीत अनेक इच्छुक, उमेदवारीवरून शिवसेनेत वाद

रवींद्र केसकर, उस्मानाबाद</strong>

लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील निवडणुकीमध्ये उतरणार नसल्याने त्यांच्याऐवजी उमदेवार कोण, याची चाचपणी सुरू झाली आहे. डॉ. पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील, त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्याबरोबरच बार्शीचे आमदार दिलीप सोपल किंवा आमदार विक्रम काळे यांची नावे राष्ट्रवादीकडून चर्चेत आणली जात आहेत. उस्मानाबादच्या नेत्यांकडून ही नावे चर्चेत असली तरी औरंगाबादची जागा राष्ट्रवादीस आघाडीतून सुटली नाही तर आमदार सतीश चव्हाण यांनी उस्मानाबादमधून लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करावी, अशी चर्चाही सुरू झाली आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेसचा एक गटही राष्ट्रवादीतील चव्हाण यांच्या उमेदवारीला अनुकूल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यास कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मधुकरराव चव्हाण यांनीही दुजोरा दिला आहे.

आमदार बसवराज पाटील आणि माजी मंत्री आमदार मधुकर चव्हाण यांचे राजकारण नेहमीच राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधाचे राहिले आहे. डॉ. पद्मसिंह एका बाजूला आणि सारे एका बाजूला असे चित्र नेहमी असे. मात्र, पुन्हा त्यांच्या घरातील उमेदवारास तिकीट देण्याऐवजी नवीन प्रयोग करावा, असे त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुचविले असल्याचे सांगण्यात येते. तुळजापूर मतदारसंघात कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. त्याचबरोबर औशाचे आमदार बसवराज पाटील यांचे मूळ गाव उमरगा मतदारसंघात असल्याने त्यांचा या विधानसभा मतदारसंघात मोठा संपर्क आहे. त्यांच्या मर्जीवरच उमरगा या राखीव विधानसभा मतदारसंघातून उमेदवार निश्चित केले जातात. त्यामुळे या दोन तालुक्यातील नेत्यांचा पाठिंबा कोणाला यावर बरेच चित्र अवलंबून असते.

कॉंग्रेसचे नेते स्थानिक पातळीवर नेहमीच राष्ट्रवादीच्या विरोधात राहिले आहेत. शिवसेनेला साथ देऊ पण राष्ट्रवादी नको अशी त्यांची भूमिका होती. त्यातही डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधावरच या जिल्हय़ातील राजकारण अवलंबून होते. तेच रिंगणात उतरणार नसल्याने कॉंग्रेसचे बळ मिळणार की नाही, यावर राजकीय चर्चा सुरू असतात.

डॉ. पद्मसिंह पाटील हे रिंगणात नसणार हे स्पष्ट झाले आहे. याऐवजी कोणाला उमेदवारी द्यायची यावर राष्ट्रवादीत खल सुरू आहे.

आमदार सतीश चव्हाण यांना लोकसभेचे वेध लागले आहेत. औरंगाबाद मतदारसंघ आघाडीत न सुटल्यास उस्मानाबाद मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची चव्हाण यांची योजना आहे. पण राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणात उस्मानाबादमधील नेत्यांचा चव्हाण यांना उमेदवारी देण्यास विरोध असल्याचे सांगण्यात येते.

‘‘राष्ट्रवादी काँग्रेसने कोणाला उमेदवारी द्यावी, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यात आपण ढवळाढवळ करणार नाही. मात्र आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी मिळाल्यास आपल्याला आनंदच वाटेल. पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांच्याशी आपले अनौपचारिक संबंध आहेत. त्यांचे वडील माझे मित्र होते. त्यामुळे आम्ही आघाडीचा धर्म पाळू.

      – मधुकर चव्हाण, आमदार

‘‘उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाकरिता अनेकजण इच्छुक आहेत. त्या अनुषंगाने दोनवेळा बैठकदेखील झाली आहे. आमदार दिलीप सोपल यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. आपण स्वत किंवा अर्चना पाटील लोकसभा निवडणूक लढविणार नसल्यास आमदार विक्रम काळेही इच्छुक आहेत. मार्च, एप्रिल या काळात मतदार संघाचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. आणखी एकदा सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्याचा अहवाल लवकरच हातात येईल. शेवटी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ठरवतील तोच अंतिम उमेदवार असेल. 

– राणा जगजितसिंह पाटील, आमदार

रवींद्र गायकवाड यांना विरोध

दुसरीकडे शिवसेनेमध्येही उमदेवारीवरून बराच खल सुरू आहे. खासदार रवींद्र गायकवाड यांचा पहिल्या तीन वर्षांत मतदारांशी संपर्कच नव्हता. अलीकडे त्यांनी काही दौरे सुरू केले आहेत. मात्र, शिवसेनेमध्ये मोठी गटबाजी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला पुन्हा विजय हवा असल्यास उमदेवार बदला, असे थेटपणे नेत्यांना सांगण्याची तयारी सुरू झाली आहे. केवळ गेल्या निवडणुकीमध्ये विजय मिळाला हा एकमेव निकष न मानता उमेदवारीचा विचार केला जावा, असा विचार शिवसैनिकांमध्येही रुजविला जात आहे. माजी आमदार ओम राजेनिंबाळकरही लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे शिवसेनेतून सांगण्यात येते. त्यामुळे उमेदवारीची चाचपणी सुरू झाली असली तरी आता राष्ट्रवादीतील तगडा उमेदवार म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील निवडणूक रिंगणात असणार नाहीत, हे मात्र स्पष्टपणे सांगितले जात आहे.