राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दुपारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांना अखेर मावळमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. काल जाहीर झालेल्या पहिल्या यादीत पार्थ पवार यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-विर्तक लढवले जात होते. पार्थ पवार यांच्यासाठी माढामधून माघार घेत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यामुळेच पहिल्या यादीत पार्थ पवार यांचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

पहिल्या यादीत राष्ट्रवादीने बारा उमेदवारांची घोषणा केली होती. दुसऱ्या यादीत राष्ट्रवादीने पाच उमेदवार जाहीर केले आहेत. नुकतचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांना शिरुरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. अमोल कोल्हे आधी शिवसेनेमध्ये होते. राष्ट्रवादीचे दुसरे मोठे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र समीर भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली आहे.

नाशिकच्या शेजारी असलेल्या दींडोरीमधून धनराज महाले बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून राष्ट्रवादी २२ जागा लढवणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी
– पार्थ पवार (मावळ)
– अमोल कोल्हे (शिरुर)
– समीर भुजबळ (नाशिक)
– धनराज महाले (दिंडोरी)
– बजरंग सोनावणे (बीड)

काल जाहीर झालेल्या पहिल्या यादीत बारामतीतून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयन राजे भोसले, कल्याणमधून बाबाजी पाटील, ठाण्यातून आनंद परांजपे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. हातकणंगले या ठिकाणी राजू शेट्टींना राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल असे जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे.