राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांची सभा आटोपली, ते सभास्थळाहून रवाना होताच, नगर शहरातील निवडणूक इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांनी सभास्थानाजवळच राडा केला. शिवीगाळ, एकमेकांवर धावून जात धक्काबुक्की करणे, कोंडाळे करणे, चप्पल भिरकावणे, असे सारे प्रकार घडले. त्यानंतर एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झालेले हे सारे गट समोरासमोर आल्याने काहीसा तणावही निर्माण झाला होता. मात्र नंतर आमच्यात काहीच घडले नाही, असे दाखवत सर्वजण पोलीस ठाण्यातून निघून गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादीतील पडझडीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी खा. पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत, नगर जिल्ह्य़ातही पक्षाची पडझड झाल्याने पवारांच्या दौऱ्याला महत्त्व होते. विधानसभेच्या निवडणुकीसाठी सध्या शहरातून आ. जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर व युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे इच्छुक आहेत. टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन्स येथे सभा होती.

पवार, त्यांच्या समवेत विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे व इतरजण पुढे रवाना होताच, मागे पुन्हा जगताप समर्थक व माजी महापौर कळमकर यांच्यामध्ये धुमश्चक्री उडाली. सभास्थळासमोर पवार यांच्यासाठी उभारलेल्या स्वागत कमानीखालीच ही घटना घडली. शिवीगाळ, धक्काबुक्की, चप्पल भिरकावणे असे प्रकार सुरु झाले. कळकमकर जगताप समर्थकांच्या कोंडाळ्यात सापडले होते. मात्र तेवढय़ात पोलिसांनी तेथे धाव घेतली, समर्थकांनी आ. जगताप यांना वाहनात पुढे बसून रवाना केले तर पोलिसांनी कळमकर व काळे यांना वाहनातून पोलीस ठाण्यात धाडले.

कळमकर व काळे यांनी आ. जगताप व समर्थकांविरुद्ध लेखी फिर्याद तयार केली, ही माहिती मिळताच जगताप समर्थकही पोलीस ठाण्यात धावले, त्यांनीही विरुद्ध फिर्याद देण्याचा पवित्रा घेतला. दोन्ही गट समोरासमोर आल्याने परिसरात काहीसा तणावही निर्माण झाला होता. तोपर्यंत आ. जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, अशोक बाबर आदी पदाधिकाऱ्यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली. नंतर जगताप, दादाभाऊ, अभिषेक, काळे यांची बंद खोलीत बराच वेळ चर्चा केली. मात्र मध्येच काळे निघून गेले. दादाभाऊ यांनी अभिषेक व काळे यांच्या तक्रारी ताब्यात  घेतल्या. काही वेळानंतर सर्वजण तक्रारी दाखल न करता पोलीस ठाण्यातून निघून गेले. कार्यकर्त्यांतील वाद होता, तो आपसात मिटला, असे नंतर दादाभाऊ कळमकर यांनी सांगितले.

मात्र नंतर पुन्हा दादाभाऊ यांच्या भुतकरवाडीतील निवासस्थानी आ. जगताप, काळे, कळमकर यांची चर्चा झाली. तेथे काही नगरसेवकही उपस्थित होते. यासंदर्भात कोणताही तक्रार दाखल नसल्याचे कोतवाली पोलिसांकडून सांगण्यात आले. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी इच्छुक तसेच त्यांच्या समर्थकांशी संपर्क केला असता, प्रतिसाद मिळाला नाही.

जाणीवपूर्वक सोशल मीडियावर अफवा

पक्षाचे शहरातील आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेबद्दल गेल्या काही दिवसांपासून संभ्रम व्यक्त केला जात होता, याच अनुषंगाने आ. जगताप यांनी सभेत बोलताना पक्षातीलच काही जण सोशल मीडियावर जाणीवपूर्वक अफवा पसरवत असल्याचा आरोपही केला. भाषण आटोपून पवार आपल्या गाडीकडे जात असताना आ. जगताप समर्थक व किरण काळे यांच्यात वादावादी झाली. जगताप समर्थकांनी काळे यांच्याभोवती कोंडाळे केले होते. त्यातून काळे यांनी कशीबशी स्वत:ची सुटका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar ahmednagar abn
First published on: 22-09-2019 at 02:22 IST