राज्यसभेच्या २५० व्या ऐतिहासिक अधिवेशनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केले. त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवे असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींच्या या प्रशंसेवर प्रतिक्रिया दिली आहे. नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी यावर भाष्य केलं.

नरेंद्र मोदींनी भाजपाचं कौतुक केल्याने अनेकांनी याचा संबंध महाऱाष्ट्रातील राजकीय परिस्थितीशी जोडला होता. यावर बोलताना शरद पवारांनी सांगितलं की, “राज्यसभेच्या महत्त्वावर चर्चा करण्यात आली. यावर मोदींनी भाष्य केलं. राज्यसभेत बोलताना मी एकदा सांगितलं होतं की, मी गेली ५२ वर्ष विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभेत आहे. मी कधीही माझ्या जागेवरुन उठून वेलमध्ये गेलेलो नाही. आपला जो काही मुद्दा आहे तो जागेवर उभा राहून मांडला पाहिजे. सभागृहाचा मान ठेवला पाहिजे असं मी म्हटलं होतं. नरेंद्र मोदींना माझ्या त्या वक्तव्याचा आधार घेत राज्यसभेत कौतुक केलं आहे”.

मोदींनी काय म्हटलं होतं ?

“राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल या दोन्ही पक्षांनी परस्परांमध्ये ठरवले होते की, कोणतेही मुद्दे असले तरी गोंधळ घालण्यासाठी वेलमध्ये जायचे नाही. असा गोंधळ त्यांनी घातला नाही तरीसुद्धा त्यांच्या राजकीय वाटचालीत कोणताही अडथळा आला नाही. सभागृह हे संवादासाठी असले पाहिजे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वादविवाद झाले तरी अडथळ्यांऐवजी संवादाचा मार्ग निवडायला हवा. इतर पक्षांनी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे”.