News Flash

शरद पवार दिल्लीसाठी रवाना; प्रशांत किशोर भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग

शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणारे शरद पवार दिल्लीसाठी रवाना झाले

NCP, Sharad Pawar, Sharad Pawar Left for Delhi, Lok Sabha Election, 2024 Election, Prashant Kishor
शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणारे शरद पवार दिल्लीसाठी रवाना झाले (Photo: PTI)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणारे शरद पवार रविवारी दिल्लीसाठी रवाना झाले असून २३ जूनपर्यंत राजधानीमध्येच असणार आहेत. शरद पवार यावेळी देशातील राजकीय स्थितीवर तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखण्यासंबंधी विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. फ्री प्रेस जर्नलने हे वृत्त दिलं आहे.

राष्ट्रवादी पक्षाने शरद पवार २३ जूनपर्यंत दिल्लीत असतील याला दुजोरा दिला आहे, मात्र त्यांनी इतर कोणतीही माहिती देण्यास नकार दिल्याचं सांगितलं आहे.

बिगर भाजप पक्षांच्या एकीसाठी शरद पवार यांचे प्रयत्न!

शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी बोलताना राष्ट्रवादी शिवसेनेला बाजूला करुन भाजपासोबत हातमिळवणी करण्याच्या शक्यता फेटाळल्या होत्या. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार सरकार पाच वर्षे टिकेल, काम करेल, नुसतेच पाच वर्षे नाही तर आगामी लोकसभेला व विधानसभेला अधिक जोमाने एकत्रित काम करेल असं सूचक विधान केलं होतं.

विशेष म्हणजे यानंतर शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात भेट झाली होती. प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली होती. त्यावरून विविध तर्क वितर्कांना उधाण आले असताना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी देशातील राजकीय परिस्थितीबाबत ही भेट झाल्याचं स्पष्ट केलं होतं.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र?; शरद पवारांचं मोठं विधान

देशात भाजपाच्या विरोधात सशक्त पर्याय उभा करण्याची राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची योजना असून, त्यादृष्टीने राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं होतं. “देशात बिगर भाजपा पक्षांचा पर्याय निर्माण करण्याची आवश्यकता शरद पवार यांनी वारंवार व्यक्त केली आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वीही पवारांनी तसे मतप्रदर्शन केलं होतं. भाजपाला सशक्त पर्याय उभा राहावा हीच शरद पवार यांची योजना आहे. यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचं,” मलिक यांनी सांगितलं होतं. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत बिगर भाजपा पक्षांचे नेतृत्व शरद पवार हे करतील, असं राष्ट्रवादीने सूचित केलं होतं. राज्यातील राष्ट्रवादीची रणनीती ठरविण्याची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्यावर सोपविण्यात येणार नसल्याचंही मलिक यांनी स्पष्ट केलं होतं.

दिल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी राज्यातील प्रश्नांसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच दिल्लीत जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वैयक्तिक भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य करत यामध्ये चुकीचं काय अशी विचारणा केली होती. तर शरद पवार यांनीही टीकाकारांना उत्तर देत शिवसेनेवर विश्वास असल्याचं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 9:51 am

Web Title: ncp sharad pawar delhi opposition parties lok sabha election sgy 87
Next Stories
1 “तुमचा ५१ वर्षीय युवा नेता निवडणुकीत सतत मार खाऊन दाढीची खुंट वाढवत फिरतोय”
2 “चव्हाण मुख्यमंत्री असतानाच जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला घरी बसविलं अन् फडणवीसांचं राज्य आलं”
3 मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका
Just Now!
X