News Flash

भाजपा-शिवसेना सत्तेच्या तिढ्यात, तर शरद पवार शेताच्या बांधावर

मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणुकीनंतरची दिशा ठरलीही

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी महायुतीला पुन्हा एकदा कौल दिला. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणुकीनंतरची दिशा ठरलीही. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतमालाची पाहणी करण्यासाठी पवार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी (एक नोव्हेंबर) ते शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी नाशिकमध्ये पोहचले. येथे द्राक्ष उत्पादकांची भेट घेत द्राक्ष बागांची पाहणी केली.

इगतपुरीजवळील टाके-घोटी गावांमधील शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. अगदी शेताच्या बांध्यावर जाऊन पवारांनी पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या पिकांची पहाणी केली. ८० व्या वर्षीही पवार एखाद्या तरूण राजकारण्याला लाजवेल इतक्या उत्साहाने काम करत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी वादळ-पावसाची तमा न बाळगता पवारांनी तरुणाच्या दमाने महाराष्ट्र पिंजून काढला. विशेष करून साताऱ्यातील पावसातील सभेनं विधानसभेतील चित्र पलटले. शरद पवार सध्या परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या मराठवाड्यात ते पाहणी दौरा करत आहेत. त्यांच्याबरोबर तरूण दमाचे धनंजय मुंडेसुद्धा आहेत.

यावर्षी परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पवार हे परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. पुढच्या काळातली राजकारण आणि समाजकारणाची गणितं ओळखत शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा नियोजित केला आहे. दुसऱ्या टप्यात बुधवारी 6 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता ते सर्वप्रथम सेलू व परिसरातील नुकसानीची पाहणी करतील त्यानंतर परभणी व परिसरातील व त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील वसमत भागातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. एकीकडे शिवसेना-भाजपा सत्तास्थापनेत मश्गुल असताना शरद पवार ८० व्या वर्षीही राज्याच्या दौरा करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 6:23 pm

Web Title: ncp sharad pawar dhanajay munde visit marathwada nck 90
Next Stories
1 बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, सीमा भागात पाळला काळा दिवस
2 मुंबईकरांना पावसानं पुन्हा गाठलं, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
3 “आता आम्ही कसं जगायचं?”; शरद पवारांना उद्विग्न शेतकऱ्यांचा सवाल
Just Now!
X