वाई : सध्या जग आणि समाजासमोर दररोज नवनवीन अडचणी उभ्या रहात आहेत. त्यामुळे जगाला समाजाच्या नवीन गरजांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांंची शिक्षणाप्रती आस्था वाढवून समाजाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षण संस्था आणि विद्यापीठांची असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे केले.

रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सातारा येथे उभारण्यात आलेल्या ‘रयत सायन्स अँड  इंनोव्हेशन अ‍ॅक्टिविटी सेंटर’, आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे नामकरण, उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अनिल काकोडकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, भाऊसाहेब कराळे, अनिल मानेकर, प्रतिभाताई पवार आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, की वातावरणातील बदलाने दररोज जगासमोर वेगवेगळ्या अडचणी समोर येत आहेत.  समाजाला या अडचणींना सामोरे जावे लागते आहे. या बदलत्या समाजाच्या व विविध क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान शिक्षण संस्थांसमोर आहे. मोठय़ा आशेने समाज यासाठी शिक्षण संस्थांकडे पहात आहे. त्या पूर्ण करणारे शिक्षण संस्था व विद्यापीठांनी द्यावे. परदेशात संशोधन करताना विद्यार्थी आणि शिक्षक हातात हात घालून काम करतात. आपल्याकडे मात्र तिथे दरी दिसते अशी खंतही पवारांनी बोलून दाखविली.

काकोडकर म्हणाले, की जागतिकीकरणाच्या नवीन प्रयोगाला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांंमध्ये प्रयोगशील जिज्ञासा जागृत करून ग्रामीण भारत उभा करणे गरजेचे आहे. शिक्षणात काय महत्त्वाचे आहे कोणते बदल रुजवावे लागतील याची काळजीही घेतली पाहिजे. नवी ज्ञानाची क्षेत्रे परिस्थितीनुरूप बदल घडविणारे जगाला हेवा वाटेल असे शास्त्रज्ञ व तंत्रज्ञान आपण उभे करू शकतो. परदेशातील शास्त्रज्ञांवर, तंत्रज्ञानावर विसंबून न राहता देशातच संशोधन संशोधक उभे करणे गरजेचे आहे.

शेतीसह अनेक घटकांवर वातावरणाचा मोठा परिणाम होत आहे. त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आपल्याच मातीतून संशोधक तयार करावे लागतील. जग बदल करेल यावर अवलंबून न राहता जगाला हेवा वाटेल असे बदल आता आपल्याला करावे लागतील. २०५० सालापर्यंत जगातील कार्बन डायॉक्साईड चे वाढत्या प्रमाणामुळे जग वेगळ्या संकटाला सामोरे जाणार आहे यासाठी वातावरणातील कार्बन डायॉक्सार्डचे प्रमाण कमी करणे व त्यावर संशोधन गरजेचे असल्याचे काकोडकर यांनी सांगितले. अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले.