News Flash

“राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये,” कांदा प्रश्नावर शरद पवारांनी घेतली बैठक

"निर्यात बंद करणं आणि आयात सुरु करणं परस्परविरोधी निर्णय"

संग्रहित (PTI)

कांदा प्रश्नावर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. तसंच कांद्याच्या दरात कायम चढ उतार होणं ही चिंतेची बाब असून कांदा आयात निर्यतीचे सर्व अधिकार केंद्राकडे असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. निर्यात बंद करणं आणि आयात सुरु करणं परस्परविरोधी निर्णय असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. शरद पवार नाशिक दौऱ्यावर असून आज त्यांच्या अध्यक्षतेखाली कांदा प्रश्नावर महत्तपूर्ण बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

शरद पवारांनी यावेळी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये असं सांगितलं. “राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये. कारण त्यांना अधिकार नाही. धाडी घालण्याच्या सूचना राज्य सरकारकडून नाही. व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईचा राज्य सरकारचा संबंध नाही. निर्यातबंदी, आयात या संदर्भातील निर्णय राष्ट्रीय पातळीवर होतात,” असं शरद पवार यांनी म्हटलं. आंतरराष्ट्रीय बाजारात नाशिकचा कांदा असतो असं यावेळी त्यांनी नमूद केलं.

“कांद्याची चर्चा झाल्याशिवाय नाशिकला आलं असं वाटत नाही. शेतकरी कष्टाने उत्पादन घेतात. प्रमाण आणि दर्जा या दोन गोष्टींमध्ये नाशिकचा पहिला क्रमांक. बाजारातील चढ उतार याची झळ कांद्याला सर्वाधिक बसते. कांद्याचा दरात कायम चढ-उतार ही चिंतेची बाब आहे. कांदा प्रश्नावर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज असून निर्यात बंद करणं आणि आयात सुरु करणं परस्परविरोधी निर्णय आहेत,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे. शरद पवारांनी यावेळी बाजार बंद ठेवणं हा तोडगा नसून व्यापाऱ्यांना कांद्याचा लिलाव सुरु करण्याचं आवाहन केलं.

आणखी वाचा- कांद्याच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकारचे निर्णय शेतकऱ्यांसाठी अडचणीचे – भुजबळ

कांदा दर साठ रुपयांवर
परदेशातून आयात वाढल्याने घाऊक बाजारात कांद्याचे दर स्थिर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबईतील एपीएमसीच्या घाऊक बाजारात मंगळवारी पाच हजार ८४४ क्विंटल कांदा आयात झाल्याने दर साठ रुपयेपर्यंत मर्यादित राहिले आहेत. किरकोळ बाजारात हा कांदा मात्र भाव खाऊन जात असल्याचे दिसून आले आहे.

देशातील कांद्याचे उत्पादन घटल्याने केंद्र सरकारने महिन्याभरापूर्वी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असून शेजारील देशांतून आयात सुरू केली आहे. राज्यात कांदा उत्पादन करणाऱ्या जिल्ह्य़ात यावेळी पडलेल्या मुसळधार पावसाने कांदा साठय़ावर पाणी फेरले आहे. त्यामुळे अर्धा अधिक कांदा चाळीतच खराब झाला असून पावसाळ्यात लावण्यात आलेली रोपे अतिवृष्टीमुळे वाहून गेली आहेत. त्यामुळे राज्यासह देशातील कांदा उत्पादन कमी झाल्याने कांद्याचे भाव वाढलेले आहेत. दिल्लीनंतर राज्यात कांद्याने शंभरी गाठण्याच्या स्थितीत असून सध्या ५० ते ७० रुपये प्रति किलो कांदा घाऊक बाजारात विकला जात आहे. कांद्याचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने इराक, अफगाणिस्तान यासारख्या देशांतून कांदा आयात करण्यास परवानगी दिली असून हा कांदा आता घाऊक बाजारात येऊ लागला आहे. त्यामुळे कांद्याचे दिवाळीपर्यंत दर स्थिर होतील असा आशावाद व्यापारी व्यक्त करीत आहेत. कांदाच्या आयात आणखी वाढल्यास कांदा घाऊक बाजारात ४० ते ५० रुपयापर्यंत मिळू शकणार असून दहा ते वीस रुपयांपर्यंत भाव कमी होऊ शकतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 2:07 pm

Web Title: ncp sharad pawar meeting on onion issue in nashik sgy 87
Next Stories
1 विश्वास बसणार नाही, पण हे महाराष्ट्रात घडलं! ६ जिल्ह्यातील महिलांनी सुरू केली ट्रॅव्हल्स कंपनी
2 हा त्याच एका कटकारस्थानाचा भाग; मराठा आरक्षणावरून चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट
3 “आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा,” रोहित पवारांकडून पंकजा मुंडेंचं जाहीर कौतुक
Just Now!
X