02 March 2021

News Flash

शरद पवारांनी कृषी कायद्यासंबंधी लिहिलेल्या ‘त्या’ पत्रावर अखेर सोडलं मौन, म्हणाले…

शरद पवारांच्या त्या पत्रावरुन विरोधक निशाणा साधत आहेत

युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र लिहिलं होतं. सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र पुन्हा एकदा व्हायरल झालं असून भाजपा पाठिंबा देण्यावरुन शरद पवारांवर निशाणा साधत आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सोमवारी पत्राचा उल्लेख करत शरद पवारांवर टीका केली होती. दरम्यान दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी यावर भाष्य केलं.

शरद पवार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधीग्रहणासंदर्भात यावेळी चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पत्राबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे त्यांनी ते थोडं नीट वाचलं असतं तर त्यांचा वेळ वाचला असता. कायद्यातील सुधारणांसंदर्भात पत्र लिहिलं होतं यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण आज जे तीन नवे कृषी विधेयक आणले आहेत त्यात याचा उल्लेख दिसत नाही”.

शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रावर अखेर राष्ट्रवादीने दिलं स्पष्टीकरण, सांगितलं की…

शरद पवार यांनी यावेळी विषय भरकटवण्यासाठी हे केलं जात असल्याचाही आरोप केला. याला जास्त महत्व देऊ नका असंही ते म्हणाले आहेत. शरद पवारांनी आपण शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचं सांगत अधिक बोलण टाळलं. मात्र पत्रकारांनी वारंवार पत्र आणि शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्न विचारल्याने शरद पवार संतापले आणि पत्रकार परिषद संपवून निघून गेले.

दरम्यान फडणवीसांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कायद्याच्या मूलभूत तत्त्वांना विरोध केलेला नाही याकडेही लक्ष वेधलं होतं. “शरद पवार यांनीही कृषीमंत्री असताना कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील बंधने हटवून शेतकऱ्यांना कोठेही शेतीमाल विकण्याची मुभा असली पाहिजे, यासह सर्व सुधारणांचे समर्थन केले होते. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कृषीमंत्री नात्याने पत्रही लिहिले होते. काँग्रसच्या २०१९ च्या निवडणूक जाहीरनाम्यात कृषी सुधारणांचे आश्वासन आहे. कंत्राटी शेतीचा कायदा राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने केला असून गेली १३-१४ वर्षे तो लागू आहे. त्यामुळे शेतीतील खासगी गुंतवणूक वाढली आहे. पण पंतप्रधान मोदी यांना विरोधासाठी विरोध करण्यासाठी राजकीय विरोधक एकवटले असल्याचा,” आरोप फडणवीस यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 12:34 pm

Web Title: ncp sharad pawar on controversy over his letters sgy 87
Next Stories
1 Bharat Bandh: संजय राऊतांचं थेट नरेंद्र मोदी, अमित शाह यांना आव्हान, म्हणाले…
2 …तर फडणवीस शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतील, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
3 #BharatBandh: दुटप्पी असल्याच्या फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले…
Just Now!
X