रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटेकवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नसल्याने त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृतीवरुन चिंता व्यक्त केली आहे. शरद पवारांनी यावरुन राज्यपालांना टोला लगावला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, “राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. हे चांगले आहे. पण मला वाटतं की, ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं”. अन्वय नाईक यांच्यासोबतचा माझा फोटो पाच वर्षांपूर्वीचा आहे असं यावेळी शरद पवारांनी स्पष्ट केलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलू देण्याची अनुमती द्यावी, अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे.

बिहार निवडणुकीवर प्रतिक्रिया, तेजस्वी यादव यांचं कौतुक
“मी जी संपूर्ण प्रचारमोहीम पाहिली त्यानुसार स्वत: पंतप्रधान यामध्ये खूप रस घेत होते. यामुळे एका बाजूला पंतप्रधान, नितीश कुमार यांच्यासारखे अनुभवी नेते आणि दुसऱ्या बाजूला अनुभव नसलेले पहिल्यांदाच निवडणूक लढणारे तेजस्वी यादव होते. यामुळे तेजस्वी यादव यांना जे यश मिळालं आहे ते खूप चांगलं आहे. यामुळे अनेक तरुणांमध्ये उमेद निर्माण होईल अशी मला आशा आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

“आज जरी बदल झाला नसला तरी हळूहळू बदल होत असल्याची वाट दिसू लागली आहे. नितीश कुमार यांना अजिबात फटका बसणार नाही असं सांगितलं जात आहे. भाजपाची संख्या वाढली, पण नितीश कुमार यांची संख्याही कमी झाली आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं. “तेजस्वी यादव यांना जितके मोकळे हात मिळतील तेवढं चागलं असं मत होतं, त्यामुळे तिथे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये चमत्कार झाला. हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

अमेरिका निवडणुकीवर भाष्य
“जगातील मोठी लोकशाही म्हणून अमेरिकेला ओळखलं जातं. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल काहीही असो, जागा दिली नाही म्हणून नाउमेद होऊन टोकांची भूमिका घेऊ नये. हा लोकांचा अधिकार आहे. निर्णय इतका स्वच्छ लागल्यानंतर अशा प्र्कराची वक्तव्यं करणं त्यांच्या वयाला शोभत नाही,” असं शरद पवार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना उल्लेखून म्हटलं. मी १४ वेळा निवडणुकीला उभं राहिले, कधी पाडलं नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं.