मनसेच्या पहिल्या अधिवेशनात पक्षाच्या बहुरंगी झेंड्याच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणाऱ्या भगव्या रंगाच्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं. याशिवाय मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे ‘ जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी न करता ‘ जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनों आणि मातांनो’ अशी साद घालून केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेने आपली भूमिका बदलल्याची चर्चा सुरू आहे. अशातच मनसेच्या बदलत्या या भूमिकेमागे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केलाय.

“मनसेच्या बदललेल्या झेंड्यामागे वेगळंच राजकारण आहे. या सगळ्यामागे शरद पवारांचं डोकं आहे. शिवसेना सत्तेसाठी हिरवी झाल्यामुळे हिंदू मतं एकगठ्ठा भाजपाला जाऊ शकतात, त्यामुळे हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी शरद पवारांनी डाव आखला आहे. त्यांच्याकडूनच मनसे प्रमुख राज ठाकरेंना प्रोत्साहन दिलं जात आहे”, असं हाके म्हणाले. पण शरद पवारांना आपल्या खेळीत यश येणार नाही असंही हाके म्हणाले.

पुढे बोलताना, “मनसेनं झेंडा बदलला आहे. हिंदू मतांसाठी ते भूमिकादेखील बदलतील. मात्र खरा हिंदुत्ववादी कोण ते जनता ओळखून आहे. त्यामुळे जनता यांच्या जाळ्यात फसणार नाही आणि त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही,” असा विश्वास हाकेंनी व्यक्त केला.