कारखानदारी बंद… शेतकरी संकटात आलाय… बेरोजगारी वाढत आहे… तरी हे राज्यकर्ते मत मागण्यासाठी येत आहेत. राज्यात आणलेल्या प्रत्येक योजनेत अपयश आले अशा लोकांना पुन्हा सत्तेत आणण्याचे काम आम्ही करणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बीड येथील जाहीर सभेत दिला. यावेळी बोलताना पवार यांनी, सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची आणि तरुणांची दिशाभूल केली आहे असा आरोपही केला.

“निवडणूकीच्या आधी राज्यातील जनतेला भेटण्यासाठी मी बाहेर पडलो आहे. आज नवी पिढी आणि शेतकरी वर्ग मला अस्वस्थ दिसतोय. ज्यांच्या हाती आपण सत्ता दिली त्यांनी शेतकऱ्यांची आणि तरुणांची दिशाभूल केली आहे”, असा आरोप शरद पवार यांनी केला. “राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आकडा समोर आलाय. शेतकऱ्यांनी कर्ज काढले पण त्यात सवलती मिळाल्या नाही. शेतकऱ्यांच्या अब्रूचा पंचनामा होत आहे. कुठे मुलीच्या लग्नात अडचण तर कुठे मुलांच्या अर्ध्या शिक्षणाची व्यथा सुरु आहे”, असेही शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना, “आम्ही सत्तेत असताना शिक्षणावर जास्त भर दिला. आज पाहिले असता देशात तसेच राज्यात शिक्षित मोठ्याप्रमाणावर आहेत. मात्र नोकरीच मिळेनाशी झाली आहे. नोकरीचे प्रमाण कमी तर अर्जदाराचे प्रमाण वाढत आहे. नाशिकमध्ये सर्वाधिक कारखाने असताना याठिकाणी १६ हजार तरुण बेरोजगार झाले आहेत. तर मुंबईची स्थिती पाहता १२० गिरणी कारखाने असताना त्यातील ११४ कारखाने बंद पडले गेले त्याठिकाणी मोठमोठ्या इमारती उभारल्या गेल्या”,असं पवारांनी नमूद केलं. तसेच, हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरी विचाराने चालणारा महाराष्ट्र आहे. यात एका बाजूला संपत्तीचा डोंगर तर दुसऱ्या बाजुला तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा दर्यासागर आहे. या समुद्राच्या पाण्याने संपत्तीचा डोंगर उध्वस्त करण्याची ताकद तुमच्यात आहे. आम्ही पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे काम केले आहे. हा महाराष्ट्र तरुण पिढीच्या हाती देऊन याची जबाबदारी धनंजय मुंडे घेतील यात शंका नाही असेही पवार म्हणाले.