रायगड जिल्ह्य़ात झालेल्या पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीत प्रस्थापितांनी आपले गड राखले. पोलादपूर व तळा येथे शिवसेना, माणगाव, म्हसळा राष्ट्रवादी काँग्रेस तर खालापूर नगर पंचायतीवर शेकापने सत्ता मिळवली. राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला एकही जागा जिंकता आले नाही.
रायगड जिल्ह्य़ात नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणुकीसाठी १० जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले. सोमवारी या सर्व ठिकाणी मतमोजणी झाली. संपूर्ण जिल्ह्य़ाचे लक्ष माणगाव नगरपंचायतीच्या निकालाकडे होते. कारण येथे शिवसेनेने राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले होते. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या अ‍ॅड. राजीव साबळे यांनी प्रचारात आघाडी घेऊन चुरस निर्माण केली होती. मात्र मतदारांवर प्रभाव पाडण्यात ते पुरते अपयशी ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पकी १३ जागा जिंकत नगर पंचायतीवर वर्चस्व कायम ठेवले. शिवसेनेला ५ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला एक जागा जिंकता आली.
राजकीय हाणामारीमुळे चच्रेत आलेली तळा नगर पंचायत शिवसेनेने सत्ता मिळवली. १७ पकी ११ जागा जिंकत शिवसेनेने गड राखला. राष्ट्रवादीला पाच जागांवर समाधान मानावे लागले तर १ जागेवर अपक्ष निवडून आला. पोलादपूर नगरपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकवला. १७ पकी १२ जागा शिवसेनेने जिंकल्या तर ५ जागा काँग्रेसने जिंकल्या. म्हसळा नगर पंचायतीत १७ पकी १० जागा जिंकून अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली. काँग्रेसने ३ तर शिवसेनेने १ जागा जिंकली. ३ ठिकाणी अपक्ष विजयी झाले.
खालापूर नगर पंचायत निवडणुकीत शेकापने बाजी मारली. १७ पकी १० जागा जिंकत शेकापने उत्तर रायगडातील आपली ताकद दाखवून दिली. शिवसेनेला ५ जागा जिंकता आल्या, तर राष्ट्रवादीला दोन जागांवर समाधान मानावे लागले. एकूणच ज्या ग्रामपंचायतींवर ज्या पक्षांची सत्ता होती, त्या पक्षांनी या नवनियुक्त नगर पंचायती कायम राखल्या.
राज्यात सत्तेत असलेल्या भजपला या नगर पंचायत निवडणुकीत मतदारांनी नाकारले. पाच नगर पंचायतींमध्ये भाजपने १९ उपेदवार उभे केले होते. यापकी एकही उमेदवार जिंकून येऊ शकला नाही. भाजपतर्फे पालकमंत्री प्रकाश मेहता, प्रवीण दरेकर आणि आमदार प्रशांत ठाकूर हे ताकदीनिशी निवडणूक प्रचारात उतरले होते. पोलादपूरमध्ये भाजपने कांग्रेसबरोबर छुपी हातमिळवणी केली होती, मात्र जनतेने त्यांना नाकारले.