29 May 2020

News Flash

“…तर तोंड लपवण्याची वेळ आलीच नसती”; राष्ट्रवादीचा फडणवीसांना टोला

नागपूर सत्र न्यायालयातील सुनावणीनंतर राष्ट्रवादीने साधला निशाणा

राष्ट्रवादीचा टोला

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस नागपूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाले होते. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र असं असलं तरी न्यायालयात जाताना फडणवीस यांनी मागण्याच्या दाराचा वापर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर टिका केली आहे.

२०१४ मधील या प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीसाठी फडणवीस न्यायलयात मागच्या दाराने गेल्याचे वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दिलं. यावरुन राष्ट्रवादीने फडणवीस यांचे एक व्यंगचित्र ट्विट करत त्यांना टोला लगावला आहे. या व्यंगचित्रामध्ये फडणवीस एका बॉक्समधून मान बाहेर काढताना दाखवण्यात आले आहेत. ‘देवेंद्रजी आता तोंड लपवून काय फायदा’ आणि ‘आधीच चूक केली नसती तर ही वेळ आली नसती,’ अशा दोन ओळी या फोटोवर लिहिल्या आहेत. तसेच या फोटोला कॅप्शन देताना त्यामध्ये फडणवीस यांना टॅग करण्यात आलं आहे. “२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप असलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सत्र न्यायालयात सुनावणीसाठी मागच्या दाराने प्रवेश केला. उमेदवारी अर्ज भरतानाच जर माहिती लपवली नसती तर आज ही वेळ आली नसती,” अशी कॅप्शन देत फडणवीसांवर राष्ट्रवादीने निशाणा साधला आहे.

जामीन मंजूर झाल्यावर फडणवीस म्हणाले…

न्यायालयाबाहेर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी, “माझ्यावरचा खटला हा १९९५ ते १९९८ दरम्यानचा आहे. एक झोपडपट्टी हटवण्यासंदर्भात कारवाई चालू असताना एक आंदोलन केलं होतं. त्यावेळी काही केसेस झाल्या होत्या. दोन खासगी तक्रारी माझ्याविरोधात झाल्या होत्या. त्या आता संपलेल्या आहेत. २०१४ च्या प्रतिज्ञापत्रात त्या खटल्यांबद्दल उल्लेख केलेला नाही, अशी तक्रार माझ्याविरोधात करण्यात आली. सत्र न्यायालयात, उच्च न्यायालयात मी यासंबंधी खटला जिंकलो. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरुन सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. आज मला हजर होण्यास सांगितलं होते. मी तिथे हजर होतो. माझ्यावर व्यक्तीगत कुठलाही खटला नाही. कुठल्या ना कुठल्या आंदोलनाच्या प्रकरणातील हे गुन्हे आहेत आणि मी सगळी प्रकरणे प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहेत. वकिलांच्या निर्णयानुसार प्रतिज्ञापत्र तयार केलं. निवडणूक जिंकण्याच्या हेतूने कोणतंही प्रकरण लपवलेलं नाही. निवडणूक विजयावर परिणाम होईल अशीही ती प्रकरणे नाहीत. सार्वजनिक जीवनात लोकांसाठी संघर्ष करताना दाखल झालेल्या गुन्ह्यांची ही प्रकरणे आहेत” अशी माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 3:27 pm

Web Title: ncp slams devendra fadnavis for entering court from back door scsg 91
Next Stories
1 कोर्टातून बाहेर आल्यावर काय म्हणाले फडणवीस…
2 माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर
3 ताम्‍हीणी घाटात भीषण अपघात, पुण्याचे तिघे जागीच ठार
Just Now!
X